दिल्लीतील व्यावसायिकाची रिक्षाचालकाकडून लूट
पुणे, ता. १४ : श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी आलेल्या दिल्लीतील एका ६९ वर्षीय व्यावसायिकास रिक्षाचालकाने चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिक सुरेशचंद्र चव्हाण हे दक्षिण दिल्लीतील बदरपूर परिसरात राहतात. ते व्यवसायानिमित्त पुण्यात आले होते. शनिवारी (ता. १२) सकाळी नऊ वाजता पुणे रेल्वे स्थानकात उतरल्यावर त्यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. पार्सल कार्यालयाजवळ थांबलेल्या एका रिक्षाचालकाने भीमाशंकरला सोडण्याची तयारी दर्शवली. प्रवास लांबचा असल्याचे सांगत रिक्षाचालकाने भाडे आधीच निश्चित केले. सकाळी सव्वानऊच्या सुमारास ते पुण्यातून निघाले. दुपारी एकच्या सुमारास भीमाशंकर येथे पोहोचले. दर्शन झाल्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास ते परत निघाले. परंतु जंगलातील एकांत रस्त्यावर रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली. त्याने व्यावसायिकास चाकू दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली.
रिक्षाचालकाने व्यावसायिकाच्या खात्यातून साडेचार हजार रुपये ऑनलाइन काढून घेतले. तसेच खिशातील १५ हजारांची रोकड हिसकावून घेतली. त्यानंतर व्यावसायिकाला जंगलातच सोडून रिक्षाचालक पसार झाला. घाबरलेल्या व्यावसायिकाने भाविकांच्या मदतीने पुणे गाठले. त्यानंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षाचालकाचा शोध घेतला जात आहे.