कौशल्यांनी परिपूर्ण युवकांनाच देश-विदेशात संधी
कौशल्य अभावाचे मूळ कारण म्हणजे तांत्रिक विषयांची अपुरी माहिती, उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रमांची मांडणी नसणे, दर्जेदार प्रशिक्षणांची कमतरता आणि असमानता हे आहे. २०२० च्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माहितीनुसार, देशातील ३० कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ७० टक्के लोकांना नवनवीन कौशल्ये शिकण्याची गरज आहे. परिपूर्ण कौशल्ये असलेले युवकच देश-विदेशात उद्योग व रोजगार संधींचे सोनं करू शकतात. दरवर्षी १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त...
- अमोल बिरारी,
उपसरव्यवस्थापक, कौशल्य प्रशिक्षण संस्था, एसआयआयएलसी, पुणे
जागतिक स्तरावर देशाची ताकद वाढविण्यात युवकांचे योगदान वाढत असून कौशल्यावर आधारित रोजगार हा विषय देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरत आहे. संशोधनानुसार, उद्योगांच्या गरजांवर आधारित कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास २०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५७० बिलियन तर जागतिक अर्थव्यवस्था ६.५ ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचू शकते. परंतु जगात केवळ ५ ते १३ टक्के लोकांनाच कौशल्य आधारित प्रशिक्षण मिळालेले असून पैकी याचे सर्वाधिक प्रमाण जपानमध्ये ८० टक्के, अमेरिकेत ५२ टक्के आणि चीनमध्ये २४ टक्के आहे.
२५ टक्के युवकच रोजगारक्षम कौशल्यांनी सज्ज
राष्ट्रीय पातळीवरील अंदाजानुसार, पिरिऑडिक लेबर फोर्स सर्व्हे आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या अहवालानुसार ६० ते ७० टक्के भारतीय युवकांमध्ये रोजगारक्षम कौशल्यांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेच्या अहवालानुसार, भारतातील केवळ ४ ते ५ टक्के कामगारांनी औपचारिक कौशल्य प्रशिक्षण घेतलेले आहे तर विकसित देशांमध्ये हे प्रमाण ५० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान आहे. दरवर्षी एक कोटीपेक्षा जास्त युवक नोकरीच्या संधी शोधतात अन् त्यापैकी २० ते २५ टक्के युवकच रोजगारक्षम कौशल्यांनी सज्ज असतात.
कौशल्यअभावाची कारणे...
१) शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योगांच्या अपेक्षांमधील अंतर
२) गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण संस्थांची कमतरता
३) ग्रामीणभागात माहिती व साधनांची उपलब्धता कमी
४) डिजिटल कौशल्य आणि नव्या तंत्रज्ञानातील अपूर्ण माहिती
व्यावहारिक शिक्षण गरजेचे
पदवीधर विद्यार्थ्यांना असणारे शैक्षणिक ज्ञान आणि उद्योगांच्या त्यांच्याकडून शैक्षणिक माहितीव्यतिरिक्त असलेल्या कौशल्यांविषयीच्या अपेक्षा यात फार मोठी तफावत दिसून येते. त्यामुळे इंजिनिअरिंग तसेच इतर क्षेत्रातील पदवीधरांना व्यवसायातील व्यावहारिक शिक्षण मिळाले नसल्याने रोजगार मिळण्यात अडचणी येतात. दैनंदिन वाचनाची सवय नसणे, गणित व डिजिटल कौशल्यांच्या अभावामुळे सध्याच्या स्पर्धात्मक युगात युवकांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे.
शासनाच्या उपाययोजना
शासनाच्या रोजगार आणि कौशल्य विकास अभियानांतर्गत कौशल्य भारत अभियान (स्किल इंडिया मिशन), पंतप्रधान कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनांद्वारे युवांमध्ये कौशल्ये वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच देश स्टॅक ही कौशल्य आणि उपजीविकेसाठी एक राष्ट्रीय डिजिटल परिसंस्था आहे, ज्याचा उद्देश विविध कौशल्य उपक्रमांना एकत्रित करणे आणि आजीवन शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे हा आहे. पीएमदिशा म्हणजे प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान, ही योजना भारतातील ग्रामीण कुटुंबांना डिजिटल साक्षरता प्रदान करण्यावर केंद्रित करत आहे. यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्ये वाढवण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत ३१.५५ दशलक्ष प्रशिक्षितांनी प्रशिक्षण घेतले असून केवळ १८ टक्के लोकांनाच रोजगार मिळाल्याचे दिसून येते. कित्येक
अभ्यासक्रमांमध्ये काही ठिकाणी महिला युवतींचा सहभाग फक्त ३३ टक्के पर्यंत आहे. गुणवत्तेला संबोधित करताना, काही आयटीआयमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची आवश्यकता आहे.
कौशल्य विकास हे केवळ बोलून म्हणून चालणार नाही तर त्यासाठी उद्योगांच्या गरजांवर आधारित आधुनिक प्रशिक्षण आणि कुशल मनुष्यबळ तयार करणाऱ्यावर परिपूर्ण सामाजिक समावेशन यांचा परिपूर्ण संगम आहे. जर हे घटक एकत्र आणले, तरच भारतातील तरुण सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनू शकतील.
उपाय काय?
- उद्योग व शिक्षण संस्थांमध्ये भागीदारी वाढवणे
- ग्रामीणभागात डिजिटल कौशल्य केंद्रे उभारणे
- महिला व वंचितांसाठी स्कॉलरशिप/स्टायपेंड देणे
- कामगारांसाठी ‘अपस्किल-रीस्किल’ मॉडेल तयार करणे
- गुणवत्तापूर्ण प्रमाणन व थेट नोकरीशी जोडलेले प्रशिक्षण देणे
भारतात या उपाययोजना गरजेच्या...
- शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण
- शालेय पातळीवरच कौशल्य शिक्षणाचा समावेश
- सहावीपासूनच व्होकेशनल अभ्यासक्रम ऐच्छिक करून विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्ये शिकवणे
- इंडस्ट्री-एकेडेमिया भागीदारी मजबूत करणे
- कॉलेज, आयटीआय, पॉलिटेक्निकमध्ये इंडस्ट्री इंटर्नशिप अनिवार्य करणे
- आधुनिक तंत्रज्ञान शिकवण्यासाठी शिक्षकांना नवीन प्रशिक्षण देणे
- उद्योगाशी थेट जोडलेली कौशल्य योजना
- ऑन द जॉब ट्रेनिंग, अप्रेंटीशीप योजनेचा विस्तार
- प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला उद्योगात किमान सहा महिने प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण
- फक्त सर्टिफिकेट न देता हमखास रोजगार देणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणांची अंमलबजावणी
- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनांना उद्योगांच्या गरजांनुसार अद्ययावत करणे
‘एसआयआयएलसी’त प्रशिक्षण
‘सकाळ माध्यम समूहा’ची ‘एसआयआयएलसी’ ही नामांकित कौशल्य प्रशिक्षण संस्था असून येथे उद्योजकता व रोजगारासंबंधी विषयांवर विविध कौशल्य प्रशिक्षणे आयोजित केली जातात. याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क : ८४८४८११५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.