उपचारासाठी चालतो, मग नोंदणीला विरोध का?
पुणे, ता. १५ : खासगी रुग्णालयातील आपत्कालीन कक्षापासून अतिदक्षता कक्षापर्यंत (आयसीयू वॉर्ड) आमचे होमिओपॅथीचे डॉक्टर निवासी डॉक्टर म्हणून राबतात. कमी पगारावर ते तुमच्या (ॲलोपॅथी) डॉक्टरांचा कामाचा ताण हलका करतात; परंतु ज्यावेळी मग आम्हाला कायद्याने मिळालेल्या हक्कानुसार ‘महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत’ (एमएमसी) नोंद करण्याची वेळ येते, त्यावेळी मात्र, प्रचंड विरोध का होतो? असा सवाल होमिओपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांकडून विचारण्यात येत आहे.
‘आधुनिक चिकित्सा औषधशास्त्र अभ्यासक्रम’ (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंद ‘एमएमसी’मध्ये करण्यास इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) विरोध केला आहे. सरकारने याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी समिती गठित केली आहे. त्यावरून ‘आयएमए’चे ॲलोपॅथीचे डॉक्टर व होमिओपॅथीचे डॉक्टर हे एकमेकांच्या आमने-सामने आले आहेत. ॲलोपॅथी डॉक्टरांनी वर्षानुवर्षे आधुनिक वैद्यकीय शिक्षण केले आहे. त्यांच्या परिषदेत होमिओपॅथी डॉक्टरांची नोंद करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ॲलोपॅथी विरुद्ध होमिओपॅथी या वादामुळे दोन्ही पॅथीच्या डॉक्टरांमध्ये फूट पडलेली आहे. होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी यावेळी त्यांच्या कामाचे स्वरूप विशद करताना सांगितले की, खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के होमिओपॅथी व ‘आयुष’चे डॉक्टर सेवा देतात. ते आपत्कालीन कक्षापासून उपचार कक्ष, अतिदक्षता कक्षात निगराणी करणे, त्याचबरोबर प्रशासनातही नोकरी करतात. अनेक डॉक्टर वर्षानुवर्षाची सेवा देऊन इतके निष्णात झालेले आहेत की ते रुग्ण आल्यावर योग्य तो औषधोपचारही करतात; तर कन्सल्टंट डॉक्टर येऊन उपचारांची माहिती घेत सूचना देतात.
मी व माझे होमिओपॅथीचे सहकारी डॉक्टर पुण्यातील नामांकित मोठ्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात कार्यरत आहोत. मुख्य डॉक्टर हे पूर्णवेळ रुग्णालयात नसतात. ते ऑन कॉल किंवा भरती झालेल्या रुग्णांना तपासण्यासाठी येतात. जेव्हा तातडीचे रुग्ण येतात, त्यावेळी आम्हीच त्याला व्हेंटिलेटर लावण्यासाठीची प्रक्रिया पार पाडतो. मुख्य डॉक्टर हे फोनवरून सूचना देतात. कारण, मुख्य डॉक्टर येईपर्यंत सर्व सेवा आम्हीच अनुभवाने देतो. पुण्यातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये होमिओपॅथी व ‘आयुष’चे डॉक्टर मुख्य उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे सहाय्यक म्हणून काम करतात. सुरुवातीचा पगार हा २० ते २५ हजार असून, नंतर तो २० ते २५ वर्ष सेवा केल्यावर जास्तीत जास्त ५० ते ६० हजारांपर्यंत जातो.
- एक महिला होमिओपॅथी डॉक्टर, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.