विमानतळ कचऱ्याबाबत प्रशासन कामाला

विमानतळ कचऱ्याबाबत प्रशासन कामाला

Published on

पुणे, ता. १७ : विमानतळाभोवतीच्या कचरा प्रश्नावर ‘सकाळ’ने आवाज उठविल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. विमानतळ परिसरात कचरा टाकला जाणार नाही, यादृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये घरोघरी कचरा संकलन, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, तीन पाळ्यांमध्ये कचरा उचलण्याची व्यवस्था अशा ठोस उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच विशेष नोडल अधिकाऱ्याच्या नियुक्तीसह सफाई सेवकांच्या विशेष पथकाची स्थापन केली आहे.
दिल्ली, मुंबईपाठोपाठ प्रवासी वाहतुकीमध्ये सर्वाधिक व्यग्र असणाऱ्या लोहगाव येथील विमानतळाभोवती असणाऱ्या कचऱ्यामुळे विमान वाहतुकीला फटका बसत होता. विमानतळाभोवती कचरा टाकण्याच्या ठिकाणी श्वान, गाई गुरांसह पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. पक्षांची विमानांना धडक बसत असल्याने तसेच विमानतळावर श्वानांचा वावर वाढल्याने विमान अपघाताच्या घटना घडू लागल्या होत्या. त्याचा फटका विमानसेवेला बसत होता. याबाबत ‘सकाळ’ने ‘विमानतळाभोवती धोक्याच्या घिरट्या’ हे वृत्त प्रसिद्ध केले. त्यामध्ये विमानतळाभोवतीच्या कचऱ्याच्या प्रश्नाची सद्यःस्थिती मांडली होती.

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून दखल
‘सकाळ’च्या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी विमानतळ, महापालिका व वाहतूक पोलिसांची महापालिकेत संयुक्त बैठक घेतली. यात मोहोळ यांनी विमानतळाभोवतीच्या कचरा समस्येची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर कचरा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने उपाय करण्यास सुरुवात केली आहे.

तीन सत्रांमध्ये काम
विमानतळ परिसरात स्वच्छता राहावी व कचरा प्रश्न सुटण्यासाठी दिवसा, रात्री व पहाटे अशा तीन सत्रांत स्वच्छता करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. त्यासाठी प्रभारी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तुळशीराम साबळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच तीन आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. संबंधित परिसरात रात्रीच्या वेळी झाडणकाम करून कचरा उचलण्यात येणार आहे. यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक व मुकादमांना घनकचरा व्यवस्थापन विभागाने सूचना दिल्या आहेत.

अशा केल्या उपाययोजना
१) बांधकाम व अतिक्रमण विभागाकडून भंगार मालाची खरेदी-विक्री दुकाने जमीनदोस्त
२) भंगार वस्तू खरेदी दुकानांवर अस्वच्छतेबद्दल कारवाई करून १५ हजार दंड
३) उघड्यावर कचरा टाकणाऱ्या भंगार वस्तू खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक व अन्य आस्थापनांना नोटिसा
४) गोठण वाडा व फॉरेस्ट पार्क येथे अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई व १६ हजार रुपये दंड
५) स्वच्छतेसाठी १० आस्थापना, १२०२ घरे स्वच्छ संस्थेला जोडली
६) कचरा न देणाऱ्या पाच आस्थापना व १६९ घरांना नोटीस
७) संतनगर, योजनानगर, माळवाडीत स्वच्छ संस्थेचे दोन सभासद वाढविले
८) मोकळ्या जमिनीवरील अस्वच्छतेबद्दल नऊ जागा मालकांना नोटीस
९) खासगी जागेवरील कचरा उचलून कुंपण घालण्याबाबत नोटीस
१०) विमानतळ परिसरातील राडारोडा केला समतल
११) उरलेले चिकन, मटण टाकणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
१२) सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत करणार जनजागृती

विमानतळ प्रशासनासमवेत समन्वय ठेवून विमानतळाभोवतीच्या परिसरातील स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. विमानतळ परिसरात तीन सत्रांमध्ये स्वच्छता केली जात असून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, नोटीस बजावण्याचे काम केले जात आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन उपाय केले जात आहेत.

- संदीप कदम,
घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com