आता हवा तेव्हा प्रवेश, हवे तेव्हा शिक्षण
पुणे, ता. १८ : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट योजनेमुळे आता विद्यार्थी शिक्षणात हवे तेव्हा प्रवेश घेऊन शिक्षण सुरू करू शकतील आणि गरज असल्यास शिक्षणात तात्पुरता विराम घेऊन काही वर्षांनी पुन्हा त्याच टप्प्यावरून शिक्षणाला सुरुवात करता येणार आहे. अशा या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आता आयोगाने मार्गदर्शक सूचनांचा मसुदा जाहीर केला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (२०२०) देशातील उच्च शिक्षणात प्रस्तावित केलेल्या ‘मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट’ योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी केव्हाही प्रवेश घेता येणार आहे, तसेच आवश्यकतेनुसार शिक्षणातून बाहेर पडता येईल आणि काही वर्षांनी पुन्हा शिक्षण सुरू करता येईल. परंतु, दरम्यान अभ्यासक्रम अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे निर्माण होणाऱ्या रिक्त जागा ‘तात्पुरती रिक्त जागा’ म्हणून जाहीर करता येतील. ‘मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट’ योजनेत दूरशिक्षण पद्धती येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाचे सचिव डॉ. मनीष जोशी यांनी याबाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
या नव्या रचनेनुसार, पदवी अभ्यासक्रमात विद्यार्थ्याला पहिल्या वर्षानंतर प्रमाणपत्र, दुसऱ्या वर्षानंतर बाहेर पडल्यास पदविका, तिसऱ्या वर्षांनंतर बाहेर पडल्यास पदवी आणि चौथ्या वर्षांनंतर बाहेर पडल्यास ऑनर्स पदवी किंवा संशोधनासह ऑनर्स पदवी मिळणार आहे. या योजनेच्या मसुद्यावर ३० जुलैपर्यंत हरकती, सूचना नोंदविता येणार आहेत.
‘क्रेडिट्स’ ठरणार महत्त्वपूर्ण
‘मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट’ ही योजना आजीवन शिक्षणास प्रोत्साहन देणारी आहे. विद्यार्थ्याचे शिक्षणातील क्रेडिट हे वैध असेल, तर विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमातून कोणत्याही टप्प्यावर बाहेर पडू शकतो किंवा त्याच ठिकाणाहून परत प्रवेश घेऊन शिक्षण पुढे सुरू ठेवू शकतो. ‘क्रेडिट्स’ची वैधता संपल्यानंतर विद्यार्थी ‘रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग’ मार्गाचा वापर करू शकतो किंवा कालबाह्य झालेल्या क्रेडिट्सचे पुनर्मूल्यांकनाच्या सुविधेचा वापर करू शकतो, असे आयोगाने मसुद्यात स्पष्ट केले आहे.
योजनेची उद्दिष्टे
- विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्था, अध्यापन पद्धती आणि शिस्तीच्या सीमांमधून मुक्तता देणे
- शिक्षण संशोधक दृष्टिकोनातून होण्यासाठी, तसेच विविध पर्यायांचा शोध घेण्याची लवचिकता देण्याचा प्रयत्न
- रिक्त जागा पारदर्शकपणे प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जातील
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘अनेक वेळा प्रवेश आणि अनेक वेळा बाहेर पडणे’ (मल्टिपल एंट्री ॲण्ड मल्टिपल एक्झिट’ ही योजना आश्वासक ठरणार आहे. उच्च शिक्षणातील एकूण नावनोंदणी गुणोत्तर सुधारण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे.
- डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.