‘मार्टी’ संस्थेच्या स्थापनेची फक्त घोषणाच अल्पसंख्याक समाजाच्या सशक्तीकरणाला दिरंगाईचा फटका - अल्पसंख्याक समाजाच्या सशक्तीकरणाला दिरंगाईचा फटका
पुणे, ता. १९ : राज्यातील अल्पसंख्याक समाजाचा मागासलेपणा दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (मार्टी) स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, अद्याप या संस्थेचे एकही कार्यालय सुरू झालेले नाही. त्यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विकासाच्या संधींना मुकावे लागत आहे. त्यामुळे सरकारने कागदी घोडे नाचविणे थांबवून लवकरात लवकर संस्थेचे कार्यालय सुरू करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘टार्टी’, ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘एमआरटीआय’ची (मार्टी) स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. या संस्थेसाठी ६.२५ कोटी रुपयांचा निधी आणि ११ पदांची मंजुरीदेखील दिली गेली. मात्र अद्याप कोणतेही कार्यालय सुरू करण्यात आलेले नाही. तसेच कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात आलेली नाही.
याविषयी विद्यार्थी मोईन शेख म्हणाले, ‘‘मार्टी’ संस्थेची घोषणा करून साधारण एक वर्षाचा कालावधी झाला. मात्र, अद्याप आतापर्यंत कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही. अल्पसंख्याक समाजामध्ये आजही सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा जाणवतो. अशा वेळी ‘मार्टी’ ही संस्था एक प्रकारची संजीवनी ठरू शकली असती, पण सरकारच्या उदासीनतेमुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सरकारने त्वरित या संस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी.’’
यासंदर्भात आमदार धीरज लिंगाडे यांनी विधान परिषदेत लक्षवेधीही मांडली होती. यावर उत्तर देताना अल्पसंख्याक विकासमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले, की संस्थेसाठी मंजूर पदांना उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच निधी खर्च करण्यासाठी नवीन लेखाशीर्षकास मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू असून, संस्थेला गतिमान करण्यासाठी सल्लागार पदाची नियुक्ती करण्याचे कामही सुरू आहे.’’
-------------
‘‘मार्टी’ संस्थेची संकल्पना निश्चितच स्वागतार्ह होती. परंतु इतका कालावधी उलटूनही त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि संधी मिळण्याची गरज आहे. ‘मार्टी’सारखी संस्था हे परिवर्तन घडवू शकते. सरकारने संस्थेच्या अंमलबजावणीसाठी तातडीची पावले उचलावीत.
- प्रीतेश पीटर रुमाव, विद्यार्थी
-------------
‘‘मार्टी’ची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास, ती अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक नवे संधीचे व्यासपीठ ठरेल. या संस्थेमुळे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना संशोधन, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळेल. आज अनेक अल्पसंख्याक विद्यार्थी योग्य माहिती व सल्ल्याच्या अभावामुळे महत्त्वाच्या संधींपासून वंचित राहतात. ‘मार्टी’ हे मार्गदर्शक केंद्र ठरून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करेल. त्यामुळे ही संस्था लवकरात लवकर प्रत्यक्षात यावी.
- सलीम पठाण, विद्यार्थी
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.