दिव्यांग सुमेधकडून आधुनिकता आणि कल्पकतेचा संगम ‘नासा’कडून कौतुकाची थाप ः विविध वस्तू आणि खेळण्यांची निर्मिती
पुणे, ता. १९ ः एरवी अभ्यासात फारसा न रमणाऱ्या पण इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात रमणाऱ्या एका दिव्यांग मुलाने अनेक कल्पक वस्तू आणि खेळणी तयार केली आहेत. सुमेध वीणा असे नाव असलेल्या या तरुणाने तयार केलेल्या एका प्रकल्पाला चक्क ‘नासा’कडूनही कौतुकाची थाप मिळाली आहे.
सुमेध हा दिव्यांग (स्लो लर्नर) असल्याने त्याचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नाही. मात्र, त्याने कोहिनूर इन्स्टिट्यूटमधून इलेक्ट्रिकलचा कोर्स केला. लहानपणापासूनच त्याला इलेक्ट्रिकलच्या वस्तूंची आवड होती. दहाव्या वर्षीपासूनच तो इलेक्ट्रिकलचे छोटे-मोठे प्रकल्प करायचा. घरातील इलेक्ट्रिकलची सर्व कामेही तो स्वतःच करायला शिकला. नंतर इलेक्ट्रॉनिक्सचीही आवड निर्माण झाल्याने त्यातून त्याने विविध खेळणी तयार करायला सुरुवात केली.
सुमेधने सुरवातीला एक वायरलेस बाहुली तयार केली. डिस्को लाइट आणि संगीतासह रिमोट कंट्रोलवर ही बाहुली चालते. त्याचा या क्षेत्रातील रस आणि गती पाहून पालकांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्यानंतर सुमेधने लहान मुलांसाठी एक ‘प्ले अँड लर्न’ खेळणे तयार केले. दिवसा सूर्याच्या प्रकाशावर चालणारा ‘सोलर लाइट देखील त्याने तयार केला आहे. सध्या तो एक स्पेस सिग्नल रिसिव्हर तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.
‘‘सुमेधला या वस्तू करण्याची अंगभूत आवड होती. त्याने स्वतःच वेगवेगळे व्हिडिओ पाहून या वस्तू तयार करायला सुरवात केली. आम्ही फक्त त्याला प्रोत्साहन दिले. त्याने तयार केलेली खेळणी आणि वस्तू उपयुक्त ठरू शकतात. त्याचे काही प्रकल्प तज्ज्ञांनी वाखाणले असून, आम्ही त्याचे ‘पेटंट’ घेण्याचा विचार करत आहोत.’’ असे सुमेधची आई सुनीता वीणा यांनी सांगितले.
‘‘माझ्या आई-वडिलांच्या सततच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले’’, असे सांगत सुमेध आपल्या यशाचे श्रेय त्यांना देतो.
----
‘नासा’कडून विशेष कौतुक
‘नासा’ने २००४ मध्ये मंगळावर पाठवलेल्या ‘मार्स रोव्हर बग्गी’ची प्रतिकृती सुमेधने तयार केली होती. विशेष म्हणजे, या बग्गीप्रमाणेच तिची सर्व उपकरणे कार्यरत असणारी ही प्रतिकृती होती. त्याने हा प्रकल्प ‘नासा’ला पाठवला होता. त्याच्या या प्रकल्पाची दखल घेऊन ‘नासा’ने त्याला कौतुकाचा संदेशही पाठवला होता.
फोटोः 32822, 32823