उद्योगविश्व आणि शिक्षण पूरक हवेत डॉ. हर्षदीप कांबळे यांची अपेक्षा, ‘जनक शोधांचे’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. १९ ः ‘‘उद्योगविश्व आणि शिक्षण यांचा ताळमेळ नसल्याचे अनेकदा जाणवले. त्यामुळे हे दोन्ही घटक एकमेकांशी पूरक हवेत. देशाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विज्ञानामधील संशोधन मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे,’’ असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले.
डॉ. जयंत खंदारे लिखित ‘जनक शोधांचे’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाळ रेड्डी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, विद्यापीठाचे संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, व्याख्याते गणेश शिंदे उपस्थित होते.
डॉ. कांबळे म्हणाले, ‘‘डॉ. जयंत खंदारे यांचे कॅन्सर रोगावरील संशोधन महत्त्वपूर्ण आहे. मनात कायम कुतूहल ठेवून प्रश्न विचारले पाहिजेत, तरच ती गोष्ट वैज्ञानिक आधारावर टिकेल. केवळ प्रश्न विचारून उपयोग नाही, तर त्यावर स्वतः उत्तर शोधणे आवश्यक आहे आणि ते लोकांना पटवून द्यावे लागेल. हा वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात तयार व्हायला हवा.’’
डॉ. खंदारे म्हणाले, ‘‘हे माझे तिसरे वैज्ञानिक पुस्तक असून, विज्ञान, इतिहासातील क्षण आणि गेल्या दोन दशकातील ६० महान वैज्ञानिकांचा अभ्यास यामध्ये आहे.’’
शिंदे म्हणाले, ‘‘चिकित्सा करायला शिकवणे, प्रश्न उपस्थित करणे आणि त्याचा शोध घेणे यासाठी नवी दिशा देणारे हे पुस्तक आहे. वैज्ञानिक तयार व्हावेत म्हणून शिक्षण व्यवस्थेत बदल आवश्यक आहेत.’’
ऋतुजा फुलकर यांनी सूत्रसंचालन केले. गौरीशंकर आनंद यांनी आभार मानले.
‘‘आपण शिक्षण सध्या गुणांमध्ये बंदिस्त करून ठेवले आहे. आम्ही जे देऊ ते शिका, अभ्यास करून परीक्षा द्या आणि उत्तीर्ण व्हा, अशी प्रवृत्ती आपण तयार केली आहे. ती बदलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. डॉ. खंदारे यांचे संशोधन अतिशय मोलाचे आहे. त्यांनी लिहिलेले ‘जनक शोधांचे’ हे पुस्तक जास्तीतजास्त शाळा, महाविद्यालयांपर्यंत पोचले पाहिजे.
- वेणुगोपाल रेड्डी, अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग
फोटो ः 32843
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.