मुख्यमंत्री सहाय्यातून सर्वसामान्‍यांचा भार हलका

मुख्यमंत्री सहाय्यातून सर्वसामान्‍यांचा भार हलका

Published on

पुणे, ता. २२ : मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचारासाठी अर्थसाहाय्य करण्यात येते. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत या कक्षाद्वारे १७ कोटी रुपयांच्या निधीद्वारे पुणे शहर व जिल्ह्यातील संलग्न असलेल्‍या ४४५ खासगी रुग्‍णालयांत उपचार घेणाऱ्या १७८५ रुग्‍णांना मदत करण्‍यात आली आहे. महागड्या उपचारांनी सर्वसामान्‍यांना परवडत नसून या सहाय्यामुळे सर्वसामान्‍यांचा भार हलका झाला आहे.
हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, अस्थिमज्जा, हात, खुबा, गुडघा प्रत्यारोपण, अंतस्थ कर्णरोपण (कॉकलियर इम्प्लाँट) यासाठी ही मदत मिळते. त्‍याचबरोबर कर्करोग, अस्थिबंध शस्त्रक्रिया, नवजात शिशू, लहान बालकासंबंधित आजार, रस्ते अपघात, मेंदू आजार, हृदयरोग, डायलिसीस, जळीत रुग्ण आणि विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण या आजारपणासाठी मदत करण्यात येते. पुण्‍यात ४४५ रुग्‍णालयांमध्‍ये हे उपचार मिळतात. २५ हजार, ५० हजार, एक लाख, जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचे आजारांनिहाय अर्थसाहाय्य करण्यात येते. उपचार पूर्ण होऊन डिस्‍चार्ज झालेल्या रुग्णाला हे अर्थसाहाय्य दिले जात नाही. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक हे आहोत.

पुण्‍यात येथे करा संपर्क
दुर्धर आजारावरील उपचारासाठी आर्थिक साहाय्य तसेच आपत्तीमध्ये देण्यात येणारे आर्थिक साहाय्य याबाबत नागरिकांना मार्गदर्शन मिळण्यासाठी जुनी जिल्हा परिषदेच्‍या इमारतीमधील तळमजल्‍यावर हा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. डॉ. मानसिंग साबळे हे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख आहेत. येथील ८०८७६७८९७७ या भ्रमणध्वनी क्रमांक तसेच cmrfpune@gmail.com ईमेल वर संपर्क साधता येतो.

असा करा अर्ज
- गरजू रुग्णांना https://cmrf.maharashtra.gov.i या संकेतस्थळावर किंवा कक्षाच्या cmrfpune@gmail.com मेलवर ऑनलाइनपद्धतीने अर्ज करता येतात
- प्रत्यक्ष कक्षात येऊन ऑफलाइनपद्धतीनेही अर्ज सादर करता येतात
- मूळ अर्जासह आवश्यक ती सर्व कागदपत्रे aao.cmrf-mh@gov.in ईमेलवर पीडीएफ स्वरूपात पाठवावे
- अर्जासोबत रुग्ण दाखल झाल्यास त्याचा जिओ टॅग छायाचित्र, निदान व उपचाराकरिता लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक हे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुखांकडून प्रमाणित केलेले असावे
- चालू आर्थिक वर्षाचा एक लाख ६० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला, रुग्णाचे आधारकार्ड, रेशनकार्ड
- व्याधी विकार, आजाराच्या संबंधी निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे, अपघातग्रस्ताच्या प्रकरणात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर)
- अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबतीत विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती मान्यता आवश्यक आहे

मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीलाही करा मदत
समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आदी घटकांना या निधीला दान करता येते. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे पोस्टल ऑर्डर, मनी ऑर्डरद्वारे धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन मदत करता येते. ही मदत आयकर सूट घेण्यास पात्र आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत जिल्ह्यात एकूण एक हजार ७८५ रुग्णांना १७ कोटी २८ लाख रुपये इतके अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. कक्षामार्फत गरीब व गरजू रुग्णांना अडचणीच्या काळात अर्थसाहाय्य करत दिलासा देण्याचे काम करण्यात येत आहे.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे

Marathi News Esakal
www.esakal.com