महापालिकेकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ‘झाडणकाम’

महापालिकेकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ‘झाडणकाम’

Published on

पुणे, ता. २१ ः महापालिकेत झाडणकामासाठी कंत्राटी कामगार म्हणून नोकरी लावून देण्याच्या आमिषाने गरजवंतांकडून हजारो रुपये उकळणाऱ्या महापालिकेच्या सेवेत कायम नोकरी बिगारी काम करणाऱ्या महिलेला अखेर निलंबित करून तिची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर रकमेत अपहार केल्याच्या संशयातून आरोग्य निरीक्षकाचीही विभागीय चौकशी होणार आहे. ‘सकाळ’ने याबाबत वृत्त देऊन हा प्रकार टाकला होता. अखेर यामध्ये कारवाई झाल्याने शहरातील सर्व आरोग्य निरीक्षक व ‘वसुली’चे काम करणाऱ्या बिगाऱ्यांनाही चांगला दणका बसणार आहे.
पुणे शहराचा विस्तार वाढत असून रोज किमान दोन कोटी चौरस मीटर इतके क्षेत्र झाडणकाम करावे लागते. यामध्ये रस्ते, सार्वजनिक जागा, महापालिकेच्या इमारती, वस्त्यांचा समावेश आहे. महापालिकेकडे कायम कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कंत्राटी सेवक नियुक्त करून त्यांच्यामार्फत झाडणकाम करून घेतले जाते. यासाठी दर वर्षी किमान १४० कोटी रुपये खर्च होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करूनही शहरात अस्वच्छता कायम असते. रस्त्यावर कचरा, माती, दगड, पालापाचोळा पडून राहत असून झाडणकाम करणारे कर्मचारी गायब आहेत. पण त्यांची हजेरी रोज लागत असून, नियमित पूर्ण पगार काढला जात आहे. कर्मचाऱ्यांची उपस्थिती दाखवली जात असतानाही शहर घाण का दिसत आहे? असा प्रश्‍न ‘सकाळ’ने उपस्थित करून क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम, बिगारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने होणारा हा गैरव्यवहार समोर आणला होता.

असा उघडकीस आला प्रकार
- सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत बिगारी काम करणाऱ्या महिलेने झाडणकामाची नोकरी लावून देण्याच्या आमिषाने महिलेकडून एक लाख ३८ हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही नोकरी दिली नसल्याने पीडित महिलेने चौकशी केली असता तिला शिवीगाळ सुरू केली
- महिलेने या विरोधात सहाय्यक आयुक्तांकडे तसेच अतिरिक्त आयुक्तांकडेही तक्रार केली होती. त्यास दरम्यान पैसे वसुली करणाऱ्या महिलेने एका पुरुष प्रभारी मुकादमाच्या विरोधात तो तिचा विनयभंग करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली
- पोलिसांनी केलेल्या चौकशीत या प्रभारी मुकादमाने चुकीचे वर्तन केले नसल्याने स्पष्ट
- तक्रारदार महिलेने अनेक महिलांना कामाला लावून देते म्हणून पैसे घेतल्याचेही आले समोर
- एवढा गंभीर प्रकार घडत असूनही महापालिका प्रशासनाने या महिलेवर व तिला पाठीशी घालणाऱ्या आरोग्य निरीक्षकांवर कारवाई केली नाही
- या प्रकारास ‘सकाळ’ने वाचा फोडल्यानंतर खळबळ उडाली
- अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश
- सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पवार यांनी चौकशी केली असता त्यात कामाला लावण्यासाठी सुमारे १८ जणांकडून पैसे घेतल्याचे स्पष्ट
- त्यानुसार परिमंडळ तीनचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडून निलंबनाचा आदेश

निविदांसाठी सादरीकरण
शहरातील रस्ते, गल्लीबोळ झाडण्यासाठी प्रशासनाने १४७ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. पण यात ठरावीक ठेकेदारांचाच फायदा झाला पाहिजे असा नियम व अटी ठेवल्या होत्या. या निविदेत रिंग झाल्याचे ‘सकाळ’ने समोर आणले होते. अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या चौकशीतही यात तथ्य आढळले होते. अतिरिक्त आयुक्तांच्या अहवालानुसार आयुक्त नवल किशोर राम यांनी ही निविदा रद्द करत जुन्या पद्धतीने निविदा काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नव्याने झाडणकामाच्या निविदांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात सहभागी होणाऱ्या ठेकेदारांना सादरीकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महिला मुकादमाने कंत्राटी काम लावून देण्याच्या आमिषाने पैसे घेतले व नोकरी दिली नाही अशी तक्रार आली होती. त्याची चौकशी केली असता सुमारे १८ जणांनी अशा प्रकारच्या तक्रार केल्या होत्या. चौकशी अहवाल उपायुक्तांकडे सादर केल्यानंतर त्यांनी संबंधित महिलेला निलंबित केले आहे. तसेच आरोग्य निरीक्षकांकडे असलेल्या पावती पुस्तकातील रकमांबाबतही अनियमितता दिसून आली आहे. त्यामुळे त्यांचीही विभागीय चौकशी करण्यात येईल.
- प्रज्ञा पवार, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय

क्षेत्रीय कार्यालय व झाडणकाम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची संख्या
हडपसर मुंढवा -७०३
औंध बाणेर - ४१९
कसबा विश्रामबाग - ५६
कोंढवा येवलेवाडी - ३१५
वारजे कर्वेनगर - ३४६
सिंहगड रस्ता - ४८६
धनकवडी सहकारनगर - ३९७
नगर रस्ता वडगाव शेरी -७४३
येरवडा कळस धानोरी - ३१५
कोथरूड बावधन - २८१
ढोले पाटील - २१६
शिवाजीनगर घोले रस्ता -१२५
बिबवेवाडी - २२२
वानवडी रामटेकडी - ३०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com