एकल महिलांचे उत्पन्न वाढणार 
जिल्हा परिषदेकडून नवीन योजनेची आखणी

एकल महिलांचे उत्पन्न वाढणार जिल्हा परिषदेकडून नवीन योजनेची आखणी

Published on

पुणे, ता. २१ ः लग्नाच्या काही दिवसानंतर पतीचा मृत्यू झाला. अजून सरकारी कागदपत्रांवर त्यांचे नावसुद्धा आले नव्हते. आधार हरवलेल्या कल्याणी (नाव बदलले आहे) यांच्यासारख्या अनेक एकल महिला आपल्या आजूबाजूला दिसतात. ज्यांच्या वाट्याला आर्थिक असुरक्षितता आणि सामाजिक दुर्लक्ष येते. अशा महिलांना पुन्हा उभे करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी जिल्हा परिषद नव्या योजनेची आखणी करत आहे. लवकरच ही योजना प्रत्यक्षात येणार असून, महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि विभक्त राहाणाऱ्या महिलांची संख्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक वेळा त्यांना घरच्या घरीच छोट्या व्यवसायासाठी प्रशिक्षणाची किंवा आर्थिक गुंतवणुकीची गरज असते. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि संधी नसल्यामुळे त्यांची क्षमता वापरली जात नाही. याच पार्श्वभूमीवर योजना राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेकडून प्रायोगिक तत्त्वावर खेड तालुक्यातील तीन गावांमधील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यास सुरवात केली आहे. तीन गावांमधून माहिती गोळा करताना आलेल्या अडचणी विचारात घेऊन काही बदल केल्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात साधारण पुढील पंधरा दिवसांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये महिलांच्या वयाची माहितीही प्रामुख्याने घेतली जाणार आहे. कारण वयाच्या आधारावर योजनेची आखणी होणार आहे. वयाच्या आधारे उत्पन्नाच्या स्रोत वाढविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन तसेच काही योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे. राज्याच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्याशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या विषयावर चर्चा केली.

कोणत्या अडचणी येतात...
शिधापत्रिका काढणे, मालमत्तेत हिस्सा मिळणे, सात बारा उताऱ्यावर नावाची नोंदणी होणे, घराच्या नोंदणीमध्ये समावेश असणे अशा अडचणींना एकल महिलांना सामोरे जावे लागते. यासह इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हा परिषदेकडून तालुका स्तरावर एक समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीची प्रत्येक महिन्याला तालुक्यात बैठक आयोजित केली जाईल. त्या समितीच्या माध्यमातून एकल महिलांचे प्रश्न सोडवले जातील तसेच योग्य मार्गदर्शनही समितीकडून मिळणार आहे.

जिल्हा परिषद काय करणार...
जिल्हा परिषदेने एकल महिलांच्या उत्पन्नवाढीसाठी आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नवीन योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्याअंतर्गत एकल महिलांना व्यवसाय, प्रशिक्षण आणि उत्पन्नवाढीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

अशी होणार अंमलबजावणी...
- प्रायोगिक तत्त्वावर खेड तालुक्यात तीन गावांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण
- पंधरा दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वेक्षण
- एकल महिलांची यादी गावपातळीवर तयार होणार
- तालुका स्तरावर समितीची स्थापना होणार

‘‘समाजामध्ये अनेक एकल महिलांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेने योजना राबविण्याचे ठरवले आहे. हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, तर एकल महिलांना समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com