रोटरी क्लब कर्वेनगरच्या अध्यक्षपदी नितीन महाजन
पुणे, ता. २२ : रोटरी क्लब कर्वेनगरच्या अध्यक्षपदी नितीन महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष दीपक थिटे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. तसेच सचिवपदी प्रभाकर वावगे यांची नियुक्ती करण्यात आली. मृत्युंजय सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल चारुचंद्र श्रोत्री, सहाय्यक प्रांतपाल स्वाती मुळे व रोटरी पदाधिकारी उपस्थित होते. महाजन यांनी आगामी काळात, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आदी विषयांवर विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.
प्रांतपालपदी डॉ. आशा देशपांडे
पुणे : इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१३च्या प्रांतपालपदी डॉ. आशा देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली. मावळत्या प्रांतपाल डॉ. शोभना पालेकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. यावेळी माजी पास्ट इंटरनॅशनल इनरव्हील रिप्रेझेंटिव्ह चारू चिंचणकर, सुनंदा हुल्याळकर, शृणाली आपटे, माधवी पुरोहित, सुजाता जयवंत, उद्योजक फत्तेचंद आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. रांका यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी ब्रेस्ट कॅन्सरविषयी महिलांमध्ये जनजागृती, निदान व आवश्यकता असल्यास वैद्यकीय साहाय्य यात काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली व यासाठी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
रोटरी क्लब विज्डमच्या अध्यक्षपदी स्वाती यादव
पुणे : रोटरी क्लब विज्डमच्या अध्यक्षपदी स्वाती यादव यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष नीलेश धोपाडे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. सचिवपदी प्रशांत अकलेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संतोष मराठे, सहाय्यक प्रांतपाल अॅड. भूषण कुलकर्णी, रोटरी पदाधिकारी, सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते. यादव यांनी आगामी वर्षात ग्रीन स्कूल्स आणि ग्रीन एक्स्पोसारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पासह अॅनिमिया, थॅलेसेमियाविषयक वैद्यकीय शिबिरे, मिलेट शेतीस प्रोत्साहन, तसेच बोअरवेल रिचार्ज व पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) आदी समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.
पांचभौतिक चिकित्सावर वैद्यकीय परिषद
पुणे : वैद्यराज दातार पांचभौतिक चिकित्सा व संशोधन केंद्र सांगली, आयडीआरए भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट वाघोली व सेंटर ऑफ एक्सलन्स, आयुष विभाग पुणे विद्यापीठ या चार संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पांचभौतिक चिकित्सा या आयुर्वेदातील विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील दोनदिवसीय वैद्यकीय परिषद आयोजित केली होती. ही परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पार पडली. परिषदेत भारतभरातून ४०० हून अधिक वैद्य विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी संशोधक उपस्थित होते. यावेळी आयुष विभागाचे डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. कौस्तुभ उपाध्याय, डॉ. तनुजा नेसरी, डॉ. राकेश शर्मा, सदानंद सरदेशमुख, वैद्य प्रशांत सुरु, गिरीश टिल्लू व सुहास जोशी उपस्थित होते.