नुसता दंड, कारवाई मात्र थंड

नुसता दंड, कारवाई मात्र थंड

Published on

पुणे, ता. २३ ः विमानतळाभोवतीच्या परिसरात चिकन-मटण विक्रीच्या दुकानातील कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांवर महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, चिकन-मटण विक्रेत्यांकडून सर्रासपणे कचरा टाकण्याचा प्रकार सुरू असतानाही, त्यांचे परवाने रद्द करण्याचे धाडस महापालिका प्रशासन दाखवत नाही. संबंधितांवर ठोस कारवाई करण्याबाबत महापालिकेच्या घनकचरा विभाग आणि पशुवैद्यकीय विभागाकडून टोलवाटोलवी केली जात आहे.
विमानतळाभोवतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे तेथे गाई-गुरे, पक्षी व श्‍वान मोठ्या संख्येने येतात. पक्षी व श्‍वानांचा मोठा फटका विमानसेवेला बसतो. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळीच महापालिका व विमानतळ प्रशासनाकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात होत्या. या प्रश्‍नावर ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात होते. ‘सकाळ’ने या गंभीर प्रश्‍नाला वाचा फोडली.

अशी आहे स्थिती
- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रश्‍नाची दखल घेत महापालिका, विमानतळ प्रशासन, वाहतूक पोलिसांना ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर महापालिकेने उपाययोजना केल्या
- मात्र विमानतळाभोवतीच्या परिसरात पक्षी व श्‍वान येण्यास कारणीभूत असलेल्या चिकन-मटण विक्रीच्या दुकानांमधील मांस व अन्य कचरा टाकण्याचा प्रकार सुरू आहे
- महापालिकेच्या घनकचरा विभागाने लोहगाव, विश्रांतवाडी, कलवडवस्ती, वाघोली, विमाननगर परिसरातील चिकन-मटण विक्रेत्यांना नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली
- आत्तापर्यंत २४ चिकन-मटण विक्री दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल
- त्यानंतरही विक्रेत्यांकडून रात्रीच्यावेळी विमानतळाभोवतीच्या परिसरात कचरा आणून टाकला जात आहे
- परंतु त्यांच्यावर परवाने रद्द करण्याची कारवाई केली जात नाही

दोन विभागांकडून टोलवाटोलवी
संबंधित विक्रेत्यांना नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई करण्याचे काम महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून केले जात आहे. तर, विमानतळाभोवती चिकन-मटण विक्री दुकानातील कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचे अधिकार घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे नाहीत. त्यासंबंधीचे अधिकार महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. तर, महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित काम घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून केले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या दोन विभागांकडून टोलवाटोलवी केली जात आहे.

वाघोलीतील स्थिती
विमानतळाजवळच असलेल्या वाघोली येथील भाजी मंडईतील कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे
- तेथील कचऱ्याच्या ठिकाणी जमा होणाऱ्या पक्षांमुळेही विमानसेवेवर परिणाम होतो
- त्यामुळे महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांकडील १५ पेक्षा जास्त कर्मचारी, असे २५० ते ३०० कर्मचारी स्वच्छतेसाठी घेतले आहेत
- संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे वाघोलीतील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहेत

विमानतळाभोवतीच्या परिसरातील संबंधित ठिकाणांवर कर्मचारी थांबवून तेथे कचरा टाकला जाऊ नये यासाठी जनजागृती केली जात आहे. परिसरातील व्यावसायिक व आस्थापनांना नोटीस बजावून २४ जणांवर दंडात्मक कारवाईही केली आहे. विमानतळ परिसर व व्हीआयपी रस्त्यावर दैनंदिन स्वच्छता केली जात आहे. तरीही कचरा टाकणाऱ्यांवर परवाने तपासणी व पुढील कार्यवाहीचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले आहे.
- संदीप कदम, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com