क्षयरोगमुक्तीसाठी महापालिकेने कंबर कसली

क्षयरोगमुक्तीसाठी महापालिकेने कंबर कसली

Published on

पुणे, ता. २४ ः महापालिका प्रशासनाकडून राबविल्या जात असलेल्या ‘क्षयरोगमुक्त भारत’ उपक्रमांतर्गत शहरामध्ये सध्या क्षयरोग तपासणी शिबिरे घेतली जात आहेत. मागील महिन्यापासून सुरू झालेल्या या शिबिरांमध्ये आत्तापर्यंत एक लाख ३९ हजार नागरिकांची क्षयरोगाबाबतची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. तपासणी झालेल्यांपैकी क्षयरोग निदान झालेल्या रुग्णांना औषधोपचार, पोषण आहार व आहारासाठीचा भत्ता महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे.
केंद्र सरकारकडून हा उपक्रम राबविला जात आहे. महापालिकेकडून जून महिन्यापासून शहराच्या वेगवेगळ्या भागांत क्षयरोग तपासणी शिबिर घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. शहरातील मधुमेह, कर्करोग, अतिताण अशा अतिजोखीमग्रस्त व्यक्तींसह शहरी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्ती, अनाथालये, वृद्धाश्रमे, वसतिगृह, निराधार व्यक्तींसह ६० वर्षांच्या पुढील व्यक्तींची क्षयरोग तपासणी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने आत्तापर्यंत एक लाख ३९ हजार ६४२ नागरिकांची तपासणी केली. सर्व तपासण्या, एक्‍स-रे अशा प्रक्रियेनंतर १५ व्यक्ती क्षयरोगग्रस्त असल्याचे या शिबिरातून आढळले आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तींना औषधोपचार, सकस पोषण आहार देण्यास सुरुवात केली आहे.
विशेषतः राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम (एनटीईपी) क्षयरुग्णांसाठी निक्षय पोषण योजना सुरू केली आहे. क्षयरोग रुग्णांना चांगल्या औषधांसह पोषण आहार मिळाल्यास क्षयरोग बरा होण्यास मदत होते. त्यादृष्टीने महापालिकेने २०२२ ते जून २०२५ पर्यंत ४४३७ क्षयरुग्णांना १७ हजार ६६९ पोषण किट वाटप केली आहेत.

दररोज किमान ५०० जणांची तपासणी केली जाते. त्यामध्ये क्षयरोगाचे निदान झाल्यास संबंधित रुग्णांना त्वरित औषधोपचार व पोषण आहार दिला जात आहे.
- डॉ. प्रशांत बोठे, शहर क्षयरोग अधिकारी, महापालिका

शिबिराचे उद्दिष्ट
- क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावरील उपचारांना प्राधान्य देणे
- क्षयरुग्णांचा मृत्यू दर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे
- वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोचविणे
- क्षयरोगाबाबत जनजागृती करणे
- क्षयरोगाबाबत असलेली भीती कमी करण्यास प्राधान्य देणे

महत्त्वाचे...
- आत्तापर्यंत झालेली क्षयरुग्ण तपासणी शिबिरे - ३९
- क्षयरोग तपासणीसाठी ठेवलेले लक्ष्य - ८ लाख ३५ हजार ९८५
- शिबिरांत आत्तापर्यंत झालेली रुग्णांची तपासणी - १ लाख २९ हजार ६४२
- क्षयरोगाची लक्षणे आढळलेल्यांची संख्या - १५८६
- क्षयरोगाचे संशयित रुग्ण - ३१३
- संशयास्पद रुग्णांची संख्या - ३१३
- थुंकीचे नमुने घेण्यात आलेल्यांची संख्या - १४८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com