तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा आहाराचे नियोजन समाजमाध्यमांवरील अशास्त्रीय माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
पुणे, ता. २७ : वाढलेले वजन कमी करण्यासाठी कसा आहार घ्यावा, याबाबत सल्ले देणारे समाजमाध्यमांवर प्रचंड व्हिडिओ आहेत. मात्र, ढोबळमानाने दिलेला आहाराबाबतचा असा सल्ला हा प्रत्येकालाच लागू होईलच असे नाही. वय, शारीरिक स्थिती, सहव्याधी यानुसार प्रत्येक व्यक्तीचा आहारही बदलतो. परंतु, वजन कमी करण्यासाठी समाजमाध्यमांवरील तथाकथित आहारतज्ज्ञांचा सल्ला सरधोपटपणे अनेक जण अंगीकारतात. त्याने वजन कमी होणे सोडाच, इतर शारीरिक त्रास वाढण्याची शक्यता वाढते. म्हणून वजन कमी करण्यासाठी समाजमाध्यमांवरील तथाकथित ‘डायटगुरूं’चा नव्हे, तर खऱ्याखुऱ्या आहारतज्ज्ञांकडे जाऊनच सल्ला घ्यावा, असे आवाहन आहारतज्ज्ञांनी केले आहे.
सध्या आपल्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ही विनासायास मिळावीत, यासाठी समाजमाध्यम, गुगल व अलीकडे ‘एआय’ मॉडेलवर शोधण्याचा कल वाढलेला आहे. त्यात मग वजन कमी करण्यासाठी आहार कसा घ्यावा, हादेखील प्रश्न आलाच. ‘वाढलेले वजन आठवड्यात कमी करा’, ‘वजन कमी करायचंय? हे तीन नियम पाळा,’ कोमट पाण्यात हे टाका, दहा किलो वजन होईल कमी’ आदी प्रकारचे व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर खास करून यू-ट्यूबवर व्हायरल होत आहेत. अनेक स्वयंघोषित ‘डायटगुरू’ आणि ‘फिटनेस एक्स्पर्ट’ आहार व व्यायामाचे सल्ले देताना दिसतात. मात्र, या माहितीवर विश्वास ठेवून त्याचे अनुकरण केल्यामुळे अनेकांना शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.
या व्हिडिओमध्ये दिलेले आहार नियम, उपवास पद्धती किंवा विशिष्ट खाद्यपदार्थांचे टाळणे हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध असतेच असे नाही. त्या व्यक्तीने दिलेला सल्ला खराच आहे, असेही नसते. त्यामुळे शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता, पचनाच्या समस्या, थकवा, अशक्तपणा अशा विविध तक्रारी उद्भवतात. काही वेळा हे प्रकार गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. या व्हिडिओंवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे समाजमाध्यमांवर चुकीची माहिती सहज प्रसारित होते. आता हे रील्स स्वरूपातही आल्याने ते प्रचंड पाहिले जातात. त्यामुळे अशा अशास्त्रीय व्हिडिओंच्या अधीन न राहता फक्त प्रशिक्षित आहारतज्ज्ञ, डॉक्टर वा व्यायामतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच आहार आणि व्यायाम करावा, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
‘‘मी काही व्हिडिओ पाहून स्वतःचे वजन कमी करण्यासाठी डायट सुरू केले होते. काही दिवस मी ते कटाक्षाने पाळले. मात्र, नंतर मला थकवा जाणवायला लागला आणि नंतर चक्कर येण्याचा प्रकार वाढला. त्यानंतर ताप आणि पित्ताचा त्रास झाला. त्यानंतर मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्ही योग्य आहारतज्ज्ञांकडूनच डायट घ्या, परस्पर डायट करणे घातक ठरू शकते, असे सांगितले.
– रूपाली कदम, गृहिणी
..........
‘‘सध्या समाजमाध्यमांवर विविध व्हिडिओ आणि अशास्त्रीय सल्ल्यांचा सुळसुळाट झालेला दिसतो. या व्हिडिओंमध्ये दिलेले आहार मार्गदर्शन सर्वांनाच लागू होईल असे नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज, वैद्यकीय स्थिती, वय, जीवनशैली वेगळी असते. तज्ज्ञ मार्गदर्शनाशिवाय केलेला आहार बदल धोका ठरू शकतो, म्हणून कोणताही आहार सुरू करण्याआधी प्रमाणित आहारतज्ज्ञ वा डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
– सुप्रीती दीक्षित, आहारतज्ज्ञ
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.