आरोपींना पोलिस कोठडी

आरोपींना पोलिस कोठडी

Published on

अटक केलेल्या सातही आरोपींना रविवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींकडून २.७ ग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा आणि मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहोत. हॉटेलच्या परिसरातून तीन व्यक्ती येऊन गेल्या आहेत. या गुन्ह्याचा सूत्रधार कोण आहे, याचा तपास करण्यात येत आहे. त्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केला. या गुन्ह्याचा तपास खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार करत आहेत. आरोपींच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. सेहुल शहा, ॲड. आबिद मुलाणी, ॲड. यश मेहता, ॲड. निवेदिता मुळे आणि ॲड. मते यांनी बाजू मांडली.

राजकीय भावनेतून कारवाई?
राजकीय कुटुंबातील असलेले खेवलेकर यांना यापूर्वीदेखील अशा गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांनी अमली पदार्थांचे सेवनही केले नाही आणि त्यांच्या ताब्यातून ते जप्तही करण्यात आले नाही. त्यांच्यावर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. पंचनाम्यात नमूद असलेल्या बाबी संशयास्पद आहेत. पोलिस यंत्रणेवर दबाव टाकून राजकीय भावनेतून ही कारवाई करण्यात आली आहे, असा युक्तिवाद ॲड. ठोंबरे यांनी केला. आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी जप्त अमली पदार्थांचे वजन जास्त दाखविले आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. कारवाई संशयास्पद असून पुढील चौकशीसाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी आरोपींना मंगळवारपर्यंत (ता. २९) पोलिस कोठडी सुनावली.

दोन आरोपी सराईत गुन्हेगार
या गुन्ह्यातील आरोपी निखिल पोपटाणी आणि श्रीपाद यादव हे दोन सराईत गुन्हेगार आहेत. पोपटाणीवर कोंढवा पोलिस ठाण्यात २०२२ मध्ये माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. यादववर बंडगार्डन, निगडी आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे अनुक्रमे जुगार, लोकसेवकावर हल्ला आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार दाखल आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com