‘मएसो’त मिळणार अभियांत्रिकी अन् कायद्याचे शिक्षण

‘मएसो’त मिळणार अभियांत्रिकी अन् कायद्याचे शिक्षण

Published on

पुणे, ता. २८ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे (मएसो) आता ‘मएसो मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालय’ आणि ‘एमईएस विधी महाविद्यालय’ याद्वारे अभियांत्रिकी आणि विधी अभ्यासक्रमास सुरुवात केली आहे, अशी माहिती सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिली.
सोसायटीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य ॲड. सागर नेवसे, सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, महाविद्यालयाचे महामात्र डॉ. संतोष देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘‘शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग (आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग) हे बी. टेक अभ्यासक्रम सुरू केला आहे. तर एमईएस विधी महाविद्यालयात तीन वर्षांचा पूर्णवेळ विधी अभ्यासक्रम सुरू केला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी २४० प्रवेश क्षमता आणि विधी अभ्यासक्रमासाठी ६० प्रवेश क्षमता आहे.’’


‘मएसो’चा समूह विद्यापीठाचा प्रस्ताव प्रलंबित
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे समूह विद्यापीठ स्थापनेसाठी मागील वर्षी प्रस्ताव सादर केला होता. त्याप्रमाणे ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्य सरकारने समूह विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी नेमलेल्या समितीने ‘मएसो’च्या संबंधित महाविद्यालयांना भेटही दिली. त्यानंतर, गेल्या नऊ महिन्यांपासून अद्याप संस्थेच्या समूह विद्यापीठाच्या प्रस्ताव सरकार दफ्तरी प्रलंबित असून राज्य सरकारकडून अद्याप त्याला मान्यता दिलेली नाही, अशी माहिती शिंदे यांनी दिली. त्यामुळे संस्थेला समूह विद्यापीठासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com