टिळक रस्त्यावर मिरवणुकीचे विशेष नियोजन

टिळक रस्त्यावर मिरवणुकीचे विशेष नियोजन

Published on

पुणे, ता. २९ : ‘‘लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्याप्रमाणेच टिळक रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणुकीचेही काटेकोर नियोजन करण्यात येईल. मिरवणुकीदरम्यान निर्माण होणारे अडथळे दूर करून ती वेळेत, शिस्तबद्धपणे आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न केले जातील,’’ अशी ग्वाही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

टिळक रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणुकीतील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ‘टिळक रस्ता विसर्जन मिरवणूक नियोजन समिती’तर्फे पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील, पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, मिलिंद मोहिते, संभाजी कदम यांच्यासह गणेश मंडळांचे अध्यक्ष धीरज घाटे, डॉ. मिलिंद भोई, शिरिष मोहीते, श्याम मानकर, सूर्यकांत पाठक, प्रवीण चोरबेले, राजा कदम आदी उपस्थित होते. या वेळी मंडळांतर्फे मिरवणूक कोणत्याही अडथळ्याशिवाय वेळेत पार पाडावी यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या. याबाबत पोलिस प्रशासनातर्फे योग्य सकारात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
घाटे म्हणाले, ‘‘टिळक रस्त्यावरील गणेश मंडळांकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेक चांगली मंडळे, देखावे आणि चांगल्या मिरवणुका काढणारी मंडळे या रस्त्यावर आहेत. मात्र अनेक वर्षांपासून फक्त लक्ष्मी रस्त्यावर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामुळे टिळक रस्त्यावर योग्य नियोजन नसल्याने मिरवणूक रेंगाळते. त्यामुळे यंदा योग्य नियोजन करून टिळक रस्त्यासाठी एक कार्यक्षम वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करावी.’’
‘‘लक्ष्मी रस्त्यावर वाढणारा ताण कमी करण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी टिळक रस्त्यावर मिरवणूक सुरू झाली. त्यावेळी रात्री साधारण ११ पर्यंत ती संपत होती. मात्र सध्या टिळक रस्त्याची परिस्थिती लक्ष्मी रस्त्यापेक्षा अधिक बिकट आहे. सकाळी ११ वाजता मिरवणूक सुरू केली तरी अनेक अडथळे असल्यामुळे रात्री १२ वाजेपर्यंत साधारण १८ ते २० मंडळेच मार्गस्थ होतात, त्यामुळे संपूर्ण मिरवणूक रेंगाळते,’’ असे मत मानकर यांनी व्यक्त केले. ‘विघ्नहर्ता न्यास’तर्फे लक्ष्मी रस्त्यावर साधारण २७२ नागरिकांना वैद्यकीय सेवा दिली, तर टिळक रस्त्यावर ३२४ हून अधिक नागरिकांना सेवा दिली. यावरून या रस्त्याची परिस्थिती लक्षात येते, असे डॉ. भोई म्हणाले.

अमितेश कुमार म्हणाले.....
१) प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि त्या भागातील गणेश मंडळांची बैठक आयोजित केली जाणार.
२) गणेश मंडळांच्या अडचणी समजून घेऊन उपाययोजना करणार.
३) टिळक रस्त्यावर प्रथम येणाऱ्या मंडळांना प्रथम प्राधान्य देत नियोजनबद्ध पद्धतीने पुढे सोडण्यात येईल.
४) विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी कोणतीही व्यक्ती मद्य विकताना आढळल्यास संबंधित दुकानांवर कठोर कारवाई केली जाईल.

पोलिस प्रशासन राबविणार उपाययोजना...
- वडारवाडी, गोखलेनगर भागातील मंडळांना केळकर रस्ता किंवा इतर पर्यायी मार्ग सुचवला जाणार
- विसर्जनाच्या दिवशी सकाळी ११ नंतर मिरवणूक संपेपर्यंत टिळक रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्याचा प्रयत्न करणार
- दहाव्या दिवशीची परवानगी अकराव्या दिवशी ग्राह्य धरली जाणार
- जिथे दोन मंडळे मार्गस्थ होऊ शकतात, त्यांचा वापर करून मिरवणूक थांबणार नाही याची काळजी घेणार
- पोलिस उपायुक्त दर्जाचा एक अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करणार
- पोलिस नियंत्रण कक्ष उभे केले जाणार
- लकडी पूल, विठ्ठल मंदिर किंवा भारती भवन परिसरात हौदांचे नियोजन, फूड झोन व स्वच्छतागृहांच्या व्यवस्थेत वाढ करण्याबाबत महापालिकेला कळविणार
- पुरेसे आणि भक्कम बॅरिकेड्स लावणार
- परतीच्या मार्गावर होणाऱ्या वाहन पार्किंगवर वाहतूक नियोजन करणार

- अनधिकृत मद्यविक्रीबाबत खबरदारी घेणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com