एप्रिल, मे महिन्यातही हाऊस पार्टी
पुणे, ता. २९ ः खराडीतील हॉटेल स्टेबर्डमधील अमली पदार्थांच्या पार्टीपूर्वी एप्रिल व मे महिन्यातदेखील हाऊस पार्टी झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधून अनेक महिलांशी चॅटिंग तसेच पार्टीचे फोटो व व्हिडिओ मिळाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी (ता. २९) न्यायालयात दिली.
अमली पदार्थांसह पार्टीप्रकरणात आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने सातही जणांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा पोलिसांनी आरोपींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले आहेत. शुक्रवारी झालेल्या पार्टीत राहुल नावाचा व्यक्ती पोलिस तपासातून निष्पन्न झाला असून तो हुक्का तयार करण्यासाठी येत होता. या आरोपीबाबत व गुन्ह्याच्या एकूण तपासाबाबत आरोपींकडे चौकशी केली असता ते तपासात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे आरोपींनी हे अमली पदार्थ कुठून आणले यात आणखी कोणत्या आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास करायचा आहे, त्यामुळे आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अमित यादव यांनी केला. गुन्ह्याच्या तपासाबाबतची माहिती खंडणी विरोध पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली. या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) कायद्यानुसार खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. सेहुल शहा, ॲड. आबिद मुलाणी, ॲड. ध्वनी शहा आणि ॲड. यश मेहता यांनी बाजू मांडली.
पाच जणांच्या पोलिस कोठडी वाढ
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी डॉ. प्रांजल खेवलकरसह पाच जणांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. तर दोन तरुणींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. डॉ. प्रांजल खेवलकर (वय ४१, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५, रा. डीएसके सुंदरबन, माळवाडी), समीर फकीर महंमद सय्यद (वय ४१, ऑर्किड सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२, डायमंड पार्क सोसायटी, वाघोली) आणि श्रीपाद मोहन यादव (वय २७, रा. पंचतारा नगर, आकुर्डी) अशी पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. तर ईशा देवज्योत सिंग (वय २२, रा. कुमार बिर्ला सोसायटी, औंध) आणि प्राची गोपाल शर्मा (वय २३, रा. गोदरेज ग्रीन सोसायटी, म्हाळुंगे) यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी झालेल्या पार्टीचाही होणार तपास
डॉ. खेवलकर यांच्या नावाने २५ व २६ जुलैलादेखील पार्टी झालेल्या हॉटेलमध्ये बुकिंग होते, असे समोर आले आहे. पोलिसांनी कारवार्इ केलेली पार्टी २७ जुलैच्या रात्री झाली होती. यापूर्वीही एप्रिल व मे महिन्यात झालेल्या पार्टीचा तपास करायचा आहे. त्या पार्टीत कोण-कोण सहभागी झाले होते, याचा तपास करायचा आहे. आरोपींचे एकूण १० मोबाईल जप्त केले आहेत. त्यांची सायबर तज्ज्ञांकडून तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
न्यायाच्या दृष्टीने योग्य नाही ः बचाव पक्ष
गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी काही मुद्देमाल हस्तगत करायचा आहे, असे पोलिसांनी नमूद केले आहे. मात्र काय जप्त करायचे आहे याचा उल्लेख रिमांड रिपोर्टमध्ये नाही. राजकीय षडयंत्र करत आरोपींना यात गोवण्यात आले आहे. या गुन्ह्यातील महिला आरोपींकडे अमली पदार्थ देण्यात आले व त्यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. सिंग या आरोपींकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. मात्र तिला पोलिस न्यायालयीन कोठडी मागत आहेत, तर डॉ. खेवलकर यांना अमली पदार्थाचे सेवन केले नसताना त्यांची पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी पोलिस करत आहेत. हे न्यायाच्या दृष्टीने योग्य नाही, असा युक्तिवाद ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला.
रोहिणी खडसे न्यायालयात हजर
डॉ. प्रांजल यांच्या पत्नी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष रोहिणी खडसे या सुनावणीला न्यायालयात हजर राहिल्या. त्या पेशाने वकील आहेत. त्या वकिलांचा पोशाख
घालून या सुनावणीला हजर होत्या. सुनावणी झाल्यानंतर त्यांनी ‘‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य नाही. माझा न्यायालयावर विश्वास आहे,’’ अशी भावना व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.