आमच्या कुटुंबीयांच्या बदनामीचे षडयंत्र ः एकनाथ खडसे
पुणे, ता. २९ : ‘‘साध्या वेशातील पोलिस माझ्या जावयावर पाळत ठेवून होते. पोलिस लगेचच पत्रकार परिषद घेउन माध्यमांना माहिती, व्हिडिओ देतात. पोलिस किंवा सरकार एवढी तत्परता हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या प्रफुल्ल लोढाबाबत का दाखवत नाहीत? या कारवाईमागे कोणीतरी ‘सूत्रधार’ असून पोलिसांनी आमच्या कुटुंबीयांच्या बदनामीचे षडयंत्र रचल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
खराडी परिसरातील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी कथित रेव्ह पार्टीवर कारवाई केली होती. त्यात खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सातजणांना अटक केली होती. ‘‘सरकारने नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणात काहीच माहिती का दिली नाही? मी स्वतः ती सीडी बघितली आहे. नाशिकच्या प्रकरणाचा आम्ही छडा लावूच. साताऱ्यातील दोन माजी मंत्र्यांचे आणि त्यांच्या मुलांचे हनी ट्रॅप प्रकरण समोर आले आहे. पण मंत्री गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅपबाबत अजूनही मौन का पाळले आहे,’’ असा सवाल करत खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
‘‘संगीत नव्हते, डीजे नव्हता, गोंधळही नव्हता, मग सातजणांच्या पार्टीला ''रेव्ह पार्टी'' कसं म्हणता? एका महिलेच्या बॅगमधून अमली पदार्थ सापडले. प्रांजल खेवलकर यांच्यावर यापूर्वी एकही गुन्हा नाही, तरीही यांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी केले. ज्यांच्या बॅगमधून अमली पदार्थ सापडले, त्यांना साक्षीदार ठेवले. मद्य सेवन केल्याचा अहवाल लगेच आला, पण ड्रग्ज चाचणीचा अहवाल अद्याप का आला नाही? जावयाचा मोबाईल, लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले. कुटुंबीयांचे खासगी फोटो बाहेर कसे आले?’’ असे सवाल करीत खडसे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबाबत आपण न्यायालयात पोलिसांवर बदनामीचा दावा दाखल करणार आहोत. पोलिस बाहुलीसारखे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘‘सरकारविरोधात मी सातत्याने सत्य मांडतोय. त्यामुळेच हे प्रकरण उभे करण्यात आले आहे. जावयाने गुन्हा केला असेल तर आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. परंतु सत्य बाहेर येणारच आणि आमचा लढा थांबणार नाही,’’ असा इशाराही खडसे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.