माझा कुंचला हीच माझी बॅट
पुणे, ता. २९ ः चित्र-शिल्पांनी सजलेले व्यासपीठ, दृकश्राव्य कार्यक्रम, शंभर दिव्यांनी केलेले भावस्पर्शी औक्षण, व्यासपीठासह सभागृहातही मान्यवरांची उपस्थिती, अशा वातावरणात ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांचे ‘हसरे शतक’ पुणेकरांनी साजरे केले. शंभरी पूर्ण करत असताना थकव्याचा लवलेशही नसणारा हा अवलिया उत्साहाने मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा राहिला अन् ‘माझा कुंचला हीच माझी बॅट, त्याच्याच साथीने हे अवघड शतक पूर्ण केले’, असे म्हणाला; तेव्हा साऱ्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना सलाम केला.
ज्येष्ठ हास्य व व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी मंगळवारी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली. यानिमित्त ‘वसुंधरा क्लब व कार्टूनिस्ट्स कम्बाइन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘सुहाना मसाले’तर्फे आयोजित ‘शि. द. १००’ या तीन दिवसीय महोत्सवाची सांगता ‘शिदं’च्या सत्काराने झाली. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महोत्सवाचे निमंत्रक आणि ‘सुहाना व प्रवीण मसालेवाले ग्रुप’चे अध्यक्ष राजकुमार चोरडिया, महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आणि कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, चारुहास पंडित, संजय मिस्त्री उपस्थित होते.
फडणीस म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये काढलेल्या मिरवणुकीत मी बँड पथकात बासरी वाजवली होती. काही काळाने सावरकरांच्या ‘काळे पाणी’ या पुस्तकासाठी चित्र काढली. बासरी ते ब्रश, हा प्रवास विलक्षण होता.’’ तसेच, ‘कोल्हापूरचा असल्याने पैलवान आणि व्यंग्यचित्रकार दोन्ही होण्याची माझी इच्छा होती, त्यासाठी प्रयत्न केले. त्यातले काय जमले हे तुमच्यासमोर आहेच’, अशी मिस्कील टिप्पणीही त्यांनी केली.
डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘‘जीवनाला तसा काही अर्थ नसतो, पण तो अर्थ देण्याची संधी आपल्याला असते, असे म्हटले जाते. ती संधी शि. द. फडणीस यांनी घेतली आणि आपले जीवन कृतार्थ केले. त्यांनी ६० वर्षांहून अधिक काळ लोकांना हसवत ठेवले, ही त्यांच्या आयुष्याची कृतार्थता आहे. त्यांची केवळ चित्रच नाहीत, तर रेषाही आपल्याला हसवतात.’’
‘‘शिदंच्या चित्रांनी जगभरातील रसिकांना आनंद दिला, अनेक पिढ्या संस्कारित केल्या. ते खऱ्या अर्थाने भारताचे सांस्कृतिक राजदूत आहेत’’, असे मत चोरडिया यांनी व्यक्त केले. ‘‘शिंदना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान करावा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांनी ‘डी.लिट.’ पदवी प्रदान करावी आणि महापालिकेने त्यांचे नावे शहरात खुले कलादालन उभे करावे’’, अशी मागणी गोयल यांनी केली. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
अन् इथेही ‘जय गुजरात’
कार्टूनिस्ट्स कम्बाइनचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी आपले मनोगत संपवताना ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हटल्यानंतर ‘जय गुजरात’ असे म्हटले. ‘‘कलाकारांना राज्याची, भाषेची सीमा नसते. त्यामुळे मी ‘जय गुजरात’ म्हणतो. व्यासपीठावर राजकुमार चोरडिया, कृष्णकुमार गोयल आहेत, त्यामुळे ‘जय राजस्थान’देखील म्हणतो आणि ममता बॅनर्जी यांनी व्यंग्यचित्रकारांना तुरुंगात टाकले असले तरी ‘जय बंगाल’देखील म्हणतो’’, अशी टिप्पणी त्यांनी केली.
ssociated Media Ids : PNE25V35616
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.