पीएमपीच्या चालकाला ‘चेकलिस्ट’ अनिवार्य बसचे ब्रेकडाऊन झाल्यास अर्ध्या दिवसाची वेतनात कपात
पुणे, ता. ३१ ः पीएमपी प्रशासनाने बसचे ‘ब्रेकडाउन’ रोखण्यासाठी आता टॉप गियर टाकला आहे. बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वीच बसची आवश्यक ती तपासणी पूर्ण झालीच पाहिजे, यासाठी विमानाप्रमाणेच बससाठीदेखील ‘चेकलिस्ट’ तयार केली जाणार आहे. यात बसशी निगडित सुमारे ११ तपासण्या असणार आहेत. चेकलिस्टप्रमाणे बस गाड्या तपासूनच बस आगारातून बाहेर पडतील. ही बस एकदा जरी वाटेत बंद पडली तरी संबंधित चालकाचे व यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्याचे अर्ध्या दिवसाचे वेतन कापले जाणार आहे. या निर्णयामुळे ब्रेकडाउनचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, तसेच प्रवासी सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून वाढते ब्रेकडाउन पीएमपीचे डोकेदुखी बनले आहे. प्रत्येक अध्यक्ष ब्रेकडाउन रोखण्यासाठी कडक पावले उचलतात. काही वेळा ठेकेदारांना आर्थिक दंडदेखील केला जातो. आता मात्र नव्या अध्यक्षांनी चेकलिस्टसह कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतल्याने याचा केवळ ठेकेदारावर नाही तर कर्मचाऱ्यांवरदेखील परिणाम होणार आहे. परिणामी बसचे ब्रेकडाउन होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पीएमपी प्रशासनाने व्यक्त केला आहे.
‘पीएमपी’ प्रशासनाने बसच्या ब्रेकडाउनला आळा घालण्यासाठी चक्क विमानाप्रमाणे ‘चेकलिस्ट’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगारातून बस बाहेर पडण्यापूर्वी चालक व यांत्रिक कर्मचाऱ्यांनी बसमधील सर्व उपकरणांची तपासणी करून, त्यावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. बसच्या देखभालीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. लवकरच याचा आदेश काढला जाणार आहे. एवढे करूनदेखील बस वाटेतच बंद पडली तर संबंधित चालकाचे व यांत्रिक कर्मचाऱ्याचे अर्ध्या दिवसाचे वेतन कापले जाणार आहे. या निर्णयामुळे बस बंद पडण्याचे प्रमाण कमी होईल. परिणामी प्रवाशांना वेळेवर बससेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
-----------
कशी आहे ‘चेकलिस्ट’?
या नव्या चेकलिस्टमध्ये ब्रेकची स्थिती, इंधन, इंजिन, दरवाजाची हालचाल, सीसीटीव्ही, जीपीएस, डिस्प्ले बोर्ड, वायपर, दिवे आदींची तपासणी समाविष्ट असेल. विमान उड्डाणाच्या आधी जशी चेक लिस्ट असते, त्याच धर्तीवर ही प्रणाली राबविण्यात येणार आहे.
“ब्रेकडाउनमुळे प्रवाशांची तर गैरसोय होतेच, शिवाय पीएमपीची प्रतिमादेखील मलिन होते. त्यामुळे आगारातून बस बाहेर पडण्यापूर्वीच ‘चेकलिस्ट’प्रमाणे बसची तपासणी करणे अनिवार्य असणार आहे. बस बंद पडल्यास त्याची माहितीदेखील मला कार्यालयातील स्क्रीनवर दिसावी, अशीदेखील यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.