सावली देणारा ‘पालवी’चा आधारवड

सावली देणारा ‘पालवी’चा आधारवड

Published on

व्यक्तिनामा, सोमवार ४ सप्टेंबरसाठी (माहितीसाठी ः नाव मंगल असंच आहे मंगला नाही) फोटो----36972

सावली देणारा ‘पालवी’चा आधारवड

- गणाधीश प्रभुदेसाई

‘‘सामाजिक स्वास्थ्य कायम राखण्यासाठी मी काय करू नये, हे पहिल्यांदा प्रत्येकाने समजावून घ्यावे. दुसऱ्याच्या वेदना जाणून घेण्याची ओढ आपल्याला हवी. मी, माझे कुटुंब असा स्वार्थी विचार सोडून इतरांचादेखील विचार आपण करावा. पलायनवाद सोडून समस्येला भिडावे. सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती वाढवावी. सामाजिक चारित्र्य संपन्नता आवश्यक आहे. वांझोटी हळहळ व्यक्त करू नका. सुसंस्कृत, निरोगी, समाजनिर्मितीसाठी कृतिशील योगदान द्या...’’ असे कळकळीचे आवाहन समाजाला करणाऱ्या पंढरपूर येथील प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या पालवी परिवाराच्या प्रमुख मंगल शहा यांचे. ‘त्यांना’ही हवा सन्मानाने जगण्याचा अधिकार...अशी भावना उराशी बाळगून बेघर, निराधार, दिव्यांग, मनोरुग्ण व खास करून एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी १९९६ पासून कार्यरत मंगलताईंना वारंगल, तेलंगण येथील लथा राजा फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय सेवा धार्मिक पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित केले आहे. शिवाय पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कारही नुकताच जाहीर झाला आहे. एखाद्याला सन्मान वा पुरस्कार मिळाल्याने त्या व्यक्तीची उंची वाढते; पण मंगलताईंचे कार्य जवळून पाहिले तर त्यांना एखादा पुरस्कार मिळणे म्हणजे त्या पुरस्काराची उंची वाढते. मंगलताईंची आत्तापर्यंतची वाटचाल सर्वांना थक्क करणारी आहे. या वयातील त्यांचा उत्साह तरुणांना लाजविणारा असाच आहे.
१९९६पासून त्यांनी मुलीबरोबर वेश्यावस्तीतील बालकांसाठी काम करायला सुरुवात केली. २००१मध्ये पंढरपूरनजीकच्या खेड्यात दोन बालके एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने त्यांना गोठ्यात टाकले होते व घरातील लोक त्यांच्या मरणाची वाट पाहत होते. ती दोन बालके त्यांनी घरी आणली. सोलापूर जिल्ह्यात कोठेही एचआयव्ही पॉझिटिव्ह किंवा एड्ससह जगणाऱ्या बालकांसाठी निवासी व्यवस्था नव्हती. त्यांचे संगोपन करण्यासाठी त्यांनी घर उभे केले व तिथूनच कामाची सुरुवात झाली जी आजपर्यंत न थकता सुरू आहे. आज मंगलताईंचे वय ‘अवघे ७१’ वर्षे आहे.
वाटेवर किती अडथळे आहेत हे सांगताना मंगलताई म्हणता, ‘‘एचआयव्ही’बाबत प्रामुख्याने बऱ्याच जणांचे अज्ञान आहे. अशा मुलांना कोणी स्वीकारायला तयारच नसल्याने मदतही मिळत नव्हती. या व्याधीबद्दल गैरसमज आहेत. शाळेत प्रवेश, वैद्यकीय उपचार लवकर मिळत नाहीत. २०१३मध्ये शाळा मंजूर झाली, मात्र कायम विनाअनुदान तत्त्वावर. त्यामुळे आजही शिकवण्यासाठी शिक्षकांची समस्या आहे. प्रामुख्याने वाड्यांवर, रस्त्यांवर, खेडोपाड्यात व दुर्गम भागात या विषयाचे प्रबोधन, समुपदेशन करणे गरजेचे आहे.’’ या बालकांना व महिलांना सन्मानाची वागणूक व पायावर उभे राहण्यासाठी सर्वतोपरी मदत गरजेची आहे. त्यांच्या हाताला काम मिळावे, एवढी साधी अपेक्षा त्या समाजाकडून व्यक्त करतात. ‘पालवी’मध्ये सध्या हिरकणी माहे, संजीवनी रुग्णालयात विविध १० प्रकल्प सुरू आहेत. सुमारे एचआयव्हीबाधित १५० मुलांवर उपचार, शिक्षण आणि त्यांच्या निवासाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. २२ महिलांचीही सांभाळ त्या करतात.
‘एचआयव्ही’सारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवायचे म्हणजे आरोग्य, आहार, शिक्षण, सामाजिक-मानसिक पाठिंबा यांचा समाज जीवनाच्या कितीतरी पुढे जाऊन विचार केला पाहिजे आणि बाधित बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठीच माझा अहोरात्र प्रयत्न असतो, असे मंगलताई सांगतात. त्‍यांच्या या प्रवासात सुरुवातीपासून त्यांच्या मुलीपासून सर्व परिवाराची भक्कम साथ मिळालेली आहे.
‘‘आमची क्षमता आम्हाला सिद्ध करायची आहे व ती आम्ही करणारच. ती क्षमता सिद्ध करण्यासाठी आम्हाला एक संधी हवी आहे. व ती संधी आपणच आम्हाला निर्माण करून देणार आहात, हा विश्‍वास! या संधीचे सोनं करण्यासाठी, ही पालवी वचनबद्ध आहे...’’ हा ‘पालवी’चा वचननामा आहे. हा वचननामा खऱ्या अर्थाने सिद्धीस नेण्यासाठी मंगलताईसारख्या आधारवडाला गरज आहे ती समाजाच्या मदतीच्या पारंब्यांची. १९९६ मध्ये ठेवलेले लक्ष्य आज साध्य झालेले असले तरी मानवतेचा हा रथ ओढण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे. मंगलताईंच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी शब्दही तोकडे पडता. म्हणून कवी बा. भ. बोरकर यांच्या कवितेचा आधार घेऊन म्हणावसं वाटतं, ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com