
पुणे, ता. १ ः निसर्ग संरक्षण व संवर्धनाचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी वर्षभर चालणाऱ्या ‘वाईल्ड इंडिया’ या कार्यक्रमाचा प्रारंभ रविवारी (ता. ३) होणार आहे. सकाळ माध्यम समूह, नेचर वॉक चॅरीटेबल ट्रस्ट व जिटेक संस्थेतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वन्यजीवनावर आधारित चित्रपट म्हटले की भारतातील एक नाव लगेच डोळ्यासमोर येते ते म्हणजे नल्ला मुत्थू. मुत्थू हे प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार असून, त्यांनी ‘वर्ल्डस मोस्ट फेमस टायगर मछली’, ‘टायगर क्विन, टायगर डायनास्टी’ ‘टायगर्स रिव्हेंज, लाईफ फोर्स - इंडियाज वेस्टर्न घाट, क्लॅश ऑफ टायगर्स’ असे भारतीय वन्यजीवनावरील अनेक माहितीपट बनवले आहेत. त्यासाठी त्यांना जगभरात विविध पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे.
रविवारी (ता. ३) नल्ला यांच्या ‘टायगर डायनास्टी’ या चित्रपटाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. राजस्थानमधील सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघ निरनिराळ्या कारणांमुळे नाहीसे झाल्यावर वाघांच्या स्थानांतरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या अंतर्गत रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील एक तरुण वाघीण ‘बघानी’ हिला सरिस्का येथे नेण्यात आले पण सरिस्कामध्ये ही वाघीण एकटी नाही. तिथे ‘रजौर’ नावाचा वाघही आहे. ‘टायगर डायनास्टी’ ही या वाघिनीची कहाणी आहे. ही वाघीण येथे राहिली का?, रजौर आपली हुकुमत सरिस्कावर स्थापन करू शकला का? हे जाणून घेण्यासाठीचा हा अप्रतिम वन्यजीव चित्रपट आहे. या सादरीकरणानंतर नल्ला उपस्थित निसर्गप्रेमींशी संवाद साधणार आहेत. तसेच या कार्यक्रमात नल्ला यांच्या ‘वाईल्ड ताडोबा’या माहितीपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
ही कार्यक्रम मालिका कीर्ती प्रभाकर गोखले आणि सदाशिव गोपाळ गोखले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जी-टेक संस्थेने प्रायोजित केली आहे. तसेच मोडगी हेरीटेज डिझाईन्स आणि चितळे आईसक्रीम्स यांचे या मालिकेला विशेष सहकार्य लाभले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, जास्तीत जास्त निसर्गप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-----------------------------
कार्यक्रमाबाबत ....
- कार्यक्रम स्थळ व वेळ ः रविवारी (ता. ३) सायंकाळी ५.४५ वाजता
- एनएफडीसीचे नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडियाचे प्रेक्षागृह
- विधी महाविद्यालय रस्ता, पुणे
-------------------------
फोटोः 36326