‘आयटी पार्क’मध्ये डबलडेकरचा प्रायोगिक ‘प्रवास’

‘आयटी पार्क’मध्ये डबलडेकरचा प्रायोगिक ‘प्रवास’

Published on

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ ः गेल्या तीन वर्षांपासून पीएमपीत दाखल होणाऱ्या ‘डबलडेकर’चा रखडलेला ‘प्रवास’ आता नव्याने सुरू होत आहे. पीएमपी प्रशासनाने पुणे व पिंपरी चिंचवड येथील आयटी पार्क असलेल्या परिसरात ‘डबलडेकर’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात स्वीच मोबिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चादेखील करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात स्वीच कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पथक पुण्यात येणार असून ‘पीएमपी’ने प्रस्तावित केलेल्या मार्गाची पाहणीदेखील करणार आहे. प्रायोगिक स्तरावर डबलडेकरच्या काही बसच्या माध्यमातून ही सेवा सुरू होईल. सेवेत काही अडचणी येतात का? हे पाहिले जाईल. त्यानंतर डबलडेकरची संख्या वाढवली जाईल.
‘पीएमपी’ प्रशासनाने पहिल्या टप्प्यात आयटी पार्क असलेल्या हिंजवडी, मगरपट्टा, खराडी आदींसारख्या प्रमुख भागांत डबलडेकर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी ‘पीएमपी’चे अध्यक्ष पंकज देवरे यांच्यासह सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन स्वीच कंपनीची बसची पाहणी करून त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली आहे. पुढील आठवड्यात ‘पीएमपी’ने सुचविलेल्या मार्गांवर डबलडेकर बसची चाचणी होणार आहे.

कशी असेल नवी डबलडेकर बस?
१. इलेक्ट्रिक व वातानुकूलित
२. बसमध्ये उत्तम सस्पेन्शन, त्यामुळे प्रवास आरामदायक
३. बसमध्ये डिजिटल तिकिटिंगची सोय
४. बसचा लुक लंडन मध्ये धावणाऱ्या बस सारखा

प्रवासी क्षमता अधिक
- प्रवासी क्षमता : बसलेले : ७० पर्यंत , उभे राहून : ४० प्रवासी
- एकाच वेळी किमान शंभराहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. त्यामुळे ‘पीएमपी’ला जास्त बसची अथवा फेऱ्यांची गरज भासणार नाही
- बसची किंमत : २ कोटी रुपये
- बसची उंची : १४ फूट ४ इंच असल्याने मेट्रोच्या स्थानकाचाही अडसर होणार नाही
- पूर्वी ‘पीएमपी’च्या ताफ्यात ‘एसएलएफ’ प्रकारची डबलडेकरची बस होती. त्याच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च जास्त होता
- नवी बस इलेक्ट्रिक आहे. त्याच्या देखभालीचा खर्च खूप कमी असणार आहे

दृष्टिक्षेपात ‘पीएमपी’
- एकूण बस संख्या : १६५०
-रोजचे प्रवासी : १२ लाख (सरासरी )
- प्रवासी उत्पन्न : १ कोटी ५० लाख (सुमारे )
- रोजचा प्रवास : ३ लाख ६० हजार किमी.
- एकूण मार्ग : ३८१ मार्गावर बस धावते

स्वीच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही प्रायोगिक स्तरावर आयटी कंपन्या असलेल्या मार्गांवर डबलडेकरची सेवा सुरू करणार आहोत. त्यांचे पथक पुण्यात आल्यानंतर ते मार्गाचे सर्वेक्षण करतील. त्यानंतर डबलडेकर धावण्यास सुरुवात होईल.
- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com