गणेश मंडळ आणि प्रशासनात हवा समन्वय
पुणे, ता. ३ : शहरातील विविध गणेश मंडळांनी ‘सकाळ’च्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या बैठकीत उत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या. ‘उत्सव सर्वांचा आहे, तर नियमही सर्वांसाठी समान हवेत’, अशी स्पष्ट भूमिका मांडत मंडळांनी मिरवणूक मार्ग, ध्वनिवर्धकाबाबत परवानगी, देखावे सादर करण्याचा कालावधी, वाहतूक कोंडी, पोलिस बंदोबस्त, महिलांची सुरक्षितता याबाबत महापालिका आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावावर बोट ठेवले. विसर्जनापुरतेच नव्हे, तर उत्सवाच्या १० दिवसांत प्रशासनाने सतत संपर्कात राहावे, अशी आग्रही भूमिका बहुसंख्य मंडळांनी घेतली. नियोजन एकसंध असावे, तरच पुण्याचा गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक ठरेल, असाही सूर बैठकीत उमटला.
गणेशोत्सवादरम्यान पादचाऱ्यांसाठी रस्ते बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यासाठी रस्ते खुले ठेवावे. शिवाय, ढोल-ताशा आणि ध्वनिवर्धकासाठी वेगवेगळे नियम नसावेत, सर्वांसाठी एकच नियम असावा म्हणजे कोणताही दुजाभाव होणार नाही.
- संजय बालगुडे, खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
उत्सव काळात पोलिस, महापालिका आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय नसल्याने अनेक अडचणी येतात. त्यामुळे प्रशासनाने मंडळांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करणे गरजेचे आहे. यामुळे उत्सव अधिक सुरळीत पार पडेल.
- पुष्कर तुळजापूरकर, नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट
उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस नेमावेत. बाहेरून येणाऱ्या महिलांसाठी पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून त्यांना गैरसोय होणार नाही.
- ऋषभ पासलकर, बाजीराव रोड नातूबाग मंडळ
लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनाचा जो उद्देश समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केला, त्याचे भान मंडळांनी ठेवावे. केवळ मनोरंजनावर लक्ष केंद्रित न करता, सजावटीच्या आणि देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश द्यावा. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंडळांच्या बैठकांमध्ये सहभागी होऊन नियोजन करावे.
- उमेश शेळगे, मराठा मित्र मंडळ
गणेशोत्सव हा गणेश मंडळांचा उत्सव आहे. त्यामुळे त्याचे नियोजन गणेश मंडळांनीच करावे. तर प्रशासनाने फक्त व्यवस्थापनाची जबाबदारी घ्यावी. प्रशासकीय हस्तक्षेपापेक्षा सहकार्याची भावना जास्त महत्त्वाची आहे.
- राहुल पारखी, श्रीराम अभिमन्यू मंडळ
महापालिका आणि पोलिस प्रशासन गणेशोत्सवाचे नियोजन फक्त विसर्जनाचा दहावा दिवस डोळ्यांसमोर ठेवून करतात. पण हा उत्सव दहा दिवसांचा असतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे. दहा दिवस शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
- पराग ठाकूर, अखिल ढोल-ताशा महासंघ
टिळक रस्त्यावर मिरवणुकीला दुसऱ्या दिवशी ध्वनिवर्धकासाठी परवानगी मिळत नाही, पण इतर रस्त्यांवर ती दिली जाते. हा दुजाभाव तत्काळ थांबवावा. अनेक मंडळे ध्वनिवर्धकासाठी लाखो रुपये खर्च करतात, पण त्याचवेळी सजावट करणाऱ्या कलाकारांचे पैसे बुडविले जातात. यामुळे कलाकारांवर अन्याय होतो.
- संदीप गायकवाड, शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळ
ध्वनिवर्धकामुळे होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ध्वनिक्षेपकांवर बंदी घालावी. तसेच, गणेशोत्सवावर प्रेम करणाऱ्या ११ ज्येष्ठ नागरिकांची एक सर्वमान्य समिती स्थापन करावी. गणेश मंडळांचे चांगले काम लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न करावेत.
- आनंद सराफ, सामाजिक कार्यकर्ते
पोलिसांवर कामाचा ताण खूप असतो. गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यांना मदत मिळावी. यासाठी ‘पोलिस मित्र’सारखी संकल्पना पुन्हा सुरू करावी, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था राखणे सोपे होईल.
- प्रशांत भोलागीर, स्वप्नशील गणेशोत्सव मंडळ
मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी फर्ग्युसन रस्ता, वडारवाडी, जनवाडी आणि गणेश खिंड रस्त्यांवरील जवळपास ५० हून अधिक मंडळे येतात. त्यांच्या सोयीसाठी नवव्या दिवशी रात्री १० नंतर फर्ग्युसन रस्ता खुला करण्यात यावा. यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित मंडळांसमवेत चर्चा करावी.
- संदीप काळे, शिवाजीनगर गणेशोत्सव मंडळ
गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत धार्मिक, पौराणिक आणि मनोरंजक देखावे पाहण्यासाठी २४ तास परवानगी मिळावी. तसेच, शहरातील मध्य भागातील रस्ते सुरू ठेवावेत, जेणेकरून नागरिकांना मंडळांचे देखावे पाहता येतील.
- सुरेश जैन, रामेश्वर चौक तरुण मंडळ ट्रस्ट
गेल्या १० वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीची जी प्रथा सुरू आहे, ती यंदाही त्याच पद्धतीने पार पाडावी, जेणेकरून शांतता आणि सुव्यवस्था कायम राहील.
- प्रतीक हराळे, नारायण पेठ, माती गणपती मंडळ ट्रस्ट
प्रत्येक मंडळ देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करते; पण रात्री उशिरापर्यंत परवानगी नसल्यामुळे हे देखावे बंद करावे लागतात. त्यामुळे लोकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचण्यासाठी रात्री उशिरापर्यंत परवानगी देण्यात यावी.
- कुणाल पवार, श्री पोटसुळ्या मारुती मंडळ गणेश पेठ
गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक मंडळासाठी महापालिकेने कचरापेटी उपलब्ध करून द्यावी. मिरवणुकीच्या वेळी बाजीराव रस्त्यावर गर्दी असल्यामुळे टिळक रस्त्याकडे जाणाऱ्या मंडळांना अडचणी येतात. यावर योग्य उपाययोजना करावी.
- श्रीपाद शेळके, वंदे मातरम संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सदाशिव पेठ
टिळक रस्त्यावर पोलिस प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे यंदा टिळक रस्त्यावर पोलिस बंदोबस्त वाढवावा. तसेच, मिरवणुकीत जास्त अंतर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
- अविनाश वाडकर, नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट
मध्यवर्ती भागात राहणाऱ्या रहिवाशांना उत्सवादरम्यान कामासाठी बाहेर पडणे अवघड होते. मंडळांच्या पासचा वापर करून स्थानिक नागरिकांना ये-जा करण्याची सूट द्यावी, जेणेकरून त्यांना गैरसोय होणार नाही.
- विशाल साळवी, लक्ष्मी रोडचा राजा गणपती चौक मित्र मंडळ
विसर्जन मिरवणुकीचे नियोजन करताना प्रशासनाने कोणताही मतभेद न करता सर्व मंडळांना समान वेळ द्यावी. यामुळे सर्व पुणेकरांसह बाहेरून आलेल्या नागरिकांना गणेशोत्सव चांगल्या प्रकारे पाहता येईल आणि चांगला संदेश मिळेल.
- उदय जगताप, आदर्श मित्र मंडळ, धनकवडी
गणेशोत्सवासाठी मिळणाऱ्या निधीचा विनियोग मंडळांच्या विधायक समाजकार्याची दखल घेऊन करावा. तसेच, मिरवणुकीतील गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ‘एक मंडळ, एक पथक’ हे धोरण राबवावे.
- गिरीश पोटफोडे, त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळ
‘नवरात्रोत्सवादरम्यान गुजरातमध्ये रात्रभर दांडिया खेळायला परवानगी असते. मग महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी वेळेची मर्यादा का असावी? ही मर्यादा काढून टाकावी, जेणेकरून लोकांना रात्रीही उत्सव साजरा करता येईल.
- संतोष भुतकर, वैभव मित्र मंडळ
पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही पर्यटक येतात. त्यामुळे एसटी, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि मेट्रो स्थानकावर कायमस्वरूपी पर्यटक मार्गदर्शन कक्ष सुरू करावेत. तसेच, पथारी व्यावसायिकांनाही योग्य सुविधा द्याव्यात.
- रोहन पायगुडे, संग्राम मित्र मंडळ
गणेश मंडळे व्यावसायिक नसून समाजोपयोगी काम करतात. त्यामुळे महापालिकेने मंडळांकडून जाहिराती लावण्यावर कर आकारू नये. यामुळे मंडळांना आर्थिक मदत मिळेल आणि ते अधिक चांगले काम करू शकतील.
- सचिन पवार, श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ
गणेशोत्सव जवळ आल्याने खरेदीसाठी मध्यवर्ती भागात मोठी गर्दी होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. त्यामुळे पाच ऑगस्टपासून जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी घालावी.
- पीयूष शहा, साईनाथ मंडळ ट्रस्ट
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी एक जबाबदार समन्वयक समिती स्थापन करावी. या समितीने उत्सव कसा असावा हे ठरवावे आणि प्रशासनाने त्याप्रमाणे काम करावे. यामुळे गणेशोत्सव अधिक नियोजनबद्ध होईल.
- सुधीर ढमाले, एकता मित्र मंडळ ट्रस्ट
विसर्जन मिरवणूक पास हा कायमस्वरूपी असावा.
- सुभाष थोरवे, राजर्षी शाहू चौक मंडळ
सरकारच्या गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राबविण्यात येणारी प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्जासोबतच छापील अर्जाची सुविधाही उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे अनेक मंडळे स्पर्धेत सहज सहभागी होऊ शकतील आणि सर्व मंडळांची नोंद सरकारपर्यंत पोहोचेल.
- आनंद सागरे, वीर हनुमान मित्र मंडळ, क्रांती चौक, बुधवार पेठ
गणेशोत्सवात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या शाळांची मैदाने वाहनतळांसाठी उपलब्ध करून द्यावीत. तसेच, विसर्जन मिरवणूक सकाळी ७ वाजता सुरू करण्यात यावी, जेणेकरून मिरवणुकीचे नियोजन अधिक सुलभ होईल आणि मिरवणूक वेळेत संपेल.
- अरुण गवळे, छत्रपती राजाराम मंडळ
पूर्वी मानाचे गणपती समाधान चौकातून दुपारी दोन वाजेपर्यंत पुढे जात असतं, पण आता त्यांना पाच वाजतात. यामुळे अनेक मंडळांना विसर्जनासाठी उशीर होतो. तसेच, लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत नंबर नसलेली मंडळे घुसल्यामुळे गोंधळ वाढतो. त्यामुळे ज्या मंडळांना अधिकृतपणे नंबर मिळाला आहे, त्या मंडळांनाच प्राधान्य देण्यात यावे.
- पै. विजय आहेर, श्री गणेश आझाद हिंद मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.