भारताचा अपमान हा डोनाल्ड ट्रंप यांचा उद्देश
‘अवर लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन’ पुस्तकाच्या कार्यक्रमात डॉ. शशी थरूर यांचे मत

भारताचा अपमान हा डोनाल्ड ट्रंप यांचा उद्देश ‘अवर लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन’ पुस्तकाच्या कार्यक्रमात डॉ. शशी थरूर यांचे मत

Published on

पुणे, ता. ३ ः ‘‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना गांभीर्याने घ्यायला हवे, पण त्यांच्या विधानांचा प्रत्येक वेळी शब्दशः अर्थ काढण्याची गरज नाही. ते भारताला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणतात, तेव्हा भारताचा अपमान करणे हा ट्रंप यांचा मुख्य उद्देश असतो. मात्र राष्ट्राध्यक्षांच्या विधानांपेक्षा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांवर दोन देशांमधील संबंध अवलंबून आहेत.’’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. शशी थरूर यांनी रविवारी व्यक्त केले.
थरूर यांच्या ‘अवर लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन’ या नव्या पुस्तकानिमित्त पुण्यात दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘अर्बन कनेक्ट’ कंपनीतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कुलकर्णी यांनी थरूर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर ‘क्रॉसवर्ड बुकस्टोअर्स’तर्फे आयोजित कार्यक्रमात ‘क्रॉसवर्ड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता यांनी थरूर यांना बोलते केले. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सर्वपक्षीय शिष्यमंडळाच्या विविध देशांमधील बैठका यशस्वी झाल्या असून, अनेक देशांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.
थरूर म्हणाले, ‘‘सध्या जग अशांत आहे. विशेषतः व्हाईट हाऊसमध्ये ट्रंप असताना ते अधिकच बेभरवशाचे आहे. भलेभले तज्ज्ञही ट्रंप यांच्या धोरणांबाबत अंदाज वर्तवू शकत नाहीत. त्यांच्या आयात शुल्कांच्या धोरणांमुळे सगळ्या जगालाच फटका बसला आहे. आपल्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. पण अमेरिका आणि भारतातील संबंध अजूनही उत्तम आहेत. आयात शुल्क कमी करण्यासाठी भारताचे लोक काम करत असून, त्यांना वेळ देण्याची गरज आहे.’’

‘‘धर्मनिरपेक्ष या शब्दाचा संविधानात समावेश करण्याची घटना दुरुस्ती लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या संसदेने मान्य केली आणि न्यायालयांनी देखील ही घटनादुरुस्ती योग्य असल्याचा निर्वाळा दिला, हे लक्षात घ्यायला हवे. हेच संविधान नागरिकांना धर्माचे, उपासनेचे स्वातंत्र्य, धर्माचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देते. धर्मनिरपेक्षता म्हणजे आणखी काय वेगळे असते? त्यामुळे धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ काय घेतला जात आहे, यावर बरेच काही अवलंबून आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये धर्मापासून राजसत्ता दूर ठेवणे, असा घेतला जातो. आपल्याकडे मात्र सर्व धर्मांना प्रोत्साहन देणे, असा या शब्दाचा अर्थ घेतला जातो.’’ असेही थरूर म्हणाले.
‘‘संविधान नागरिकांना अधिकार प्रदान करते, पण त्या अधिकारांचा उपयोग करून संविधानाला अर्थ प्राप्त करून देण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपली आहे. नागरिकांनी अधिकारांचा उपयोग केला नाही; तर हिरावून घेण्याचा मोह सत्ताधीशांना होणारच. त्यामुळे संविधानाची सुरक्षितता नागरिकांवर अवलंबून आहे. संविधान वाचता न येणारी एखादी निरक्षर महिला देखील संविधानाने मला हक्क दिले आहेत, असे म्हणते. याचाच अर्थ आपल्या मनात आणि मेंदूत संविधान कोरले गेले आहे.’’ असे मत शशी थरूर यांनी व्यक्त केले.
----
भावी उपराष्ट्रपती की परराष्ट्र मंत्री?
तुम्ही भावी उपराष्ट्रपती आहात, केरळचे भावी मुख्यमंत्री आहात की भावी परराष्ट्र मंत्री, असा प्रश्न शशी थरूर यांना दोन्ही कार्यक्रमांमध्ये विचारण्यात आला. त्यावर ‘‘सध्या तरी एकच पद रिक्त आहे.’’ असे मिस्कीलपणे म्हणत ‘परराष्ट्र मंत्रीही उत्तम काम करत आहेत. त्यांना करू द्या. माझी कोणत्याही पदाची आकांक्षा नाही. भविष्यात देशासाठी आवश्यक ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे.’’ असे त्यांनी स्पष्ट केले.
फोटो ः 37038

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com