

पुणे, ता. ११ : महात्मा जोतिराव फुले यांचे प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी फुले वाड्याच्या आजूबाजूची जागा ताब्यात देण्याबाबत नागरिकांनी होकार दर्शविला आहे. ही जागा ताब्यात घेऊन लवकरच स्मारकाचे काम सुरू केले जाईल. याबाबत महापालिका आयुक्तांना सूचना देणार आहे. पुढील वर्षी स्मारकाच्या कामाबाबत मोठी प्रगती झालेली असेल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. ११) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले वाडा येथे अभिवादन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ‘‘कोणत्याही महापुरुषाची जयंती आली की स्मारकाचा मुद्दा पुढे येतो. फुले वाड्याच्या आजूबाजूची जागा घेऊन या ठिकाणी चांगले स्मारक उभारायचे आहे. यासाठी येथील नागरिकांनी जमिनी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याआधी त्यांचे पुनर्वसनदेखील करायचे आहे. भुजबळ असतील की इतर कुणी, काही घटनांमुळे वेदना होतात. त्यामुळे यात राजकारण आणण्याची गरज नाही.’’
बनेश्वर रस्त्याचे काम मार्गी लावण्याच्या सूचना
भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करावे याच्या सूचना जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासाठी नऊ एप्रिल रोजी सुप्रिया सुळे यांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. याबाबत अजित पवार म्हणाले की, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांना हा रस्ता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा ६०० मीटरचा रस्ता असून, या रस्त्यासाठी परत कुणालाही तिथे उपोषण करण्याची पाळी येता कामा नये.
अहवाल आल्यावर कारवाई करणार
कुठल्याही रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा असतो. चांगली सेवा मिळावी म्हणूनच सरकारकडून रुग्णालयाला निधी दिला जातो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सेवाभावी वृत्तीने काम केले पाहिजे. दीनानाथ प्रकरणाचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री यांच्याकडे पोहचला आहे. तिसरा अहवाल आल्यानंतर सरकार योग्य ती कारवाई करेल. आम्ही सरकारी पैसे चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून देतो. एवढे पैसे हळदी-कुंकू पूजेसाठी ठेवलेत का? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
मंगेशकर कुटुंबीयांचे देशासाठी योगदान
मंगेशकर कुटुंबीयांविषयी आदर व्यक्त करत अजित पवार म्हणाले की, मंगेशकर कुटुंबीयांचे देशासाठीचे योगदान मोठे आहे. या कुटुंबाच्या पाचही भावंडांचे योगदान अत्युच्च आहे. देशातील सर्व नागरिकांना याची माहिती असून, महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्याबद्दल अपार आदर आहे. त्यामुळे काही वक्तव्य करताना काळजी घ्यायला हवी, असेही पवार यावेळी म्हणाले. मंगेशकर कुटुंबीयांचे गाणे म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी असल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान असल्याचे मत व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.