फुले स्मारकासाठी तातडीने बैठक

फुले स्मारकासाठी तातडीने बैठक
Published on

पुणे, ता. ११ ः राज्य सरकारने महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकासाठी जागा निश्‍चित करून वर्ष उलटले असले तरीही महापालिकेकडून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यावरून पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. ११) सकाळी झाडाझडती घेतल्यानंतर महापालिकेत या स्मारकाच्या भूसंपादनासाठी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दुपारी बैठक घेतली. या कामासाठी उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्याकडे जबाबदारी देण्यात आली असून, तीन महिन्यांत जागामालक, भाडेकरूसोबत चर्चा करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
महात्मा फुले पेठेत महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ही दोन स्मारके आहेत. या दोन्ही स्मारकांमध्ये काही घरे आहेत. पण तेथे भूसंपादन करून ही दोन्ही स्मारके एकत्र करून एकच मोठे भव्य स्मारक उभे राहावे, अशी मागणी नागरिकांची आहे. यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही केली आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार या स्मारकाच्या एकत्रीकरणासाठी ५ हजार ३१० चौरस मीटरची जागा ताब्यात घ्यावी लागणार आहेत. यात एकूण ९१ मिळकती बाधित होत असून, यामध्ये ५१६ मालक आणि २८५ भाडेकरू आहेत. गेल्या वर्षीच येथील जागामालक व भाडेकरूंसोबत चर्चा करून भूसंपादनासाठी प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश दिला होता, पण त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.

मोबदला देण्याबाबत एकमत नाही
स्मारकासाठी जागा ताब्यात घेताना यात काही निवासी, तर काही व्यावसायिक जागा आहेत. काही जागामालकांनी महापालिकेकडे रोख स्वरूपात मोबदला मागितला आहे, तर व्यावसायिक जागेसाठी रोख रकमेशिवाय अन्य पर्यायांचा विचार महापालिका करत आहे. छगन भुजबळ यांच्या नाराजीनंतर व अजित पवार यांनी कान टोचल्यानंतर आता महापालिकेला मोबदला देण्यासाठी एकमत घडवून आणावे लागणार आहे. तसेच व्यावसायिक जागेसाठी रोखीच्या बदल्यात टीडीआर, एफएसआयसाठी प्रशासनाने आग्रह धरल्यास भूसंपादन लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महात्मा फुले स्मारकासाठी उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यांच्या मदतीला अन्य कर्मचारी, अधिकारीही दिले जातील. स्मारकामुळे बाधित होणाऱ्या प्रत्येक नागरिकासोबत महापालिकेचे कर्मचारी चर्चा करतील. त्यांना मोबदला कसा हवा आहे, याची ते माहिती संकलित करणार आहोत. त्यानंतर त्यांना मोबदला दिला जाईल. हे काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण केले जाईल.
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

‘महात्‍मा फुले यांचे प्रेरणादायी स्मारक लवकरच’
महात्मा जोतिराव फुले यांचे प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी फुले वाड्याच्या आजूबाजूची जागा ताब्यात देण्याबाबत नागरिकांनी होकार दर्शविला आहे. ही जागा ताब्यात घेऊन लवकरच स्‍मारकाचे काम सुरू केले जाईल. याबाबत महापालिका आयुक्तांना सूचना देणार आहे. पुढील वर्षी स्मारकाच्या कामाबाबत मोठी प्रगती झालेली असेल, असे आश्‍वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com