अभ्यासात सातत्य हेच आंबेडकरांना अभिवादन
पुणे, ता. १३ : ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना फक्त काही तास, काही दिवस अभ्यास करून चालणार नाही. तर विद्यार्थ्यांनी कायम चिकित्सक दृष्टी ठेवून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. हेच डॉ. आंबेडकर यांना खरे अभिवादन ठरेल, हाच मार्ग यशाची दिशा दाखवेल,’’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी रविवारी व्यक्त केले.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स असोसिएशन’तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘१८ तास अभ्यास अभियान’ उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, मानव्यविद्या शाखेचे विभागप्रमुख डॉ. विजय खरे, शिक्षणशास्त्र प्रशाळा विभागाचे संचालक विलास आढाव, डॉ. आंबेडकर अध्ययनाचे डॉ. सुधाकर बोकेफोडे, डॉ. सदानंद भोसले, संघटनेचे अध्यक्ष अमोल सरवदे आदी उपस्थित होते. या उपक्रमात ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सकाळी ६ वाजता उपक्रमाची सुरुवात झाली अन् रात्री १२ वाजता समारोप झाला.
डॉ. आढाव म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स असोसिएशन ही संघटना सुमारे ३५ वर्षांपासून महात्मा फुले आणि आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक व अभ्यास उपक्रम राबविते. मेणबत्ती, अगरबत्ती, हारफुले अर्पण करण्यास विसरलात तरी चालेल, पण महापुरुषांचे विचार विसरू देऊ नका.’’
महान व्यक्ती नेमके कोणाला म्हणायचे ही आंबेडकर यांनी सांगितलेली महान व्यक्तींची (ग्रेट मॅन) संकल्पना डॉ. खरे यांनी मांडली. संविधानाच्या प्रास्ताविकेबद्दल डॉ. भाकरे यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन सागर सोनकांबळे यांनी केले तर राहुल रूही यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
