बालकांच्या डोळ्यांकडे पाहा डोळसपणे

बालकांच्या डोळ्यांकडे पाहा डोळसपणे

Published on

पुणे, ता. १५ ः नवजात बालकांच्या डोळ्यांची तपासणी ही त्‍याच्‍या निरोगी आयुष्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत नेत्ररोग तज्ञांनी व्यक्त केले. जन्म झाल्यानंतर पहिल्या महिन्यात साध्या २ ते ३ चाचण्यांद्वारे डोळ्यातील संभाव्य आजारांचे निदान केले जाऊ शकते. यानंतर तीन वर्षे वय होण्यापूर्वी नियमित डोळ्यांची तपासणी करावी. त्‍याने जन्मजात दृष्टिदोष कळण्यास व त्‍यावर वेळीच उपचार होण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात.
याबाबत एच. व्ही. देसाई आय रुग्‍णालयाच्‍या वैद्यकीय संचालक डॉ. सुचेता कुलकर्णी म्हणाल्या की, जन्माच्या पहिल्या वर्षात डोळ्यांच्या संभाव्य आजारांसाठी नवजात बालकांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये जन्मजात मोतीबिंदू, डोळ्यांचा कर्करोग (रेटिनोब्लास्टोमा), काचबिंदू आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांसाठी रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी या तपासण्यांचा समावेश आहे. एकीकडे बालमृत्यू दर कमी होत असताना चांगले जीवनमान आणि सर्वांगीण विकासासाठी डोळ्यांच्या आरोग्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. लवकर निदान केल्यास संभाव्य अंधत्व टाळता येऊ शकते, असेही त्‍या म्हणाल्या.

हे लक्षात ठेवा
१) पालकांनी डोळ्यांच्या नियमित तपासणीसाठी पाठपुरावा करावा
२) बुब्बुळात जर पांढरा ठिपका आढळल्यास, तिरळेपणा निदर्शनास आल्यास किंवा जर बालकांची नजर एक ठिकाणी स्थिर होत नसेल तर त्वरित नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधावा
३) नवजात शिशूंमध्ये जन्मजात नेत्र आजारांचे निदान करणे महत्त्वाचे असते
४) ज्या पालकांच्या चष्म्याचा नंबर जास्त असेल त्यांनी त्‍यांच्‍या नवजात शिशूंची व त्‍यापुढेही नियमित तपासणी, पाठपुरावा करणे गरजेचे

कोणत्‍या आहेत तपासण्‍या?
- सामान्य बालकांच्या तपासणीमध्ये रेड रिफ्लक्स (डोळ्यांच्या बाहुल्यांवर चमकदार प्रकाश टाकून केली जाणारी चाचणी) वापरून तपासणी केली जाते
- सखोल मुल्यांकनासाठी अल्ट्रा साउंड किंवा इमेजिंगसारख्या चाचण्या उपलब्‍ध
- मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांसाठी आरओपी चाचणी असून यामध्ये डोळ्यात विशिष्ट औषध टाकून बाहुल्यांचा आकार मोठा करून प्रकाशाद्वारे नेत्रपटल व इतर भागांची तपासणी केली जाते

आता प्रत्येक शाळेमध्ये विशेष करून शहरी भागात डोळे व आरोग्य तपासणी नियमित केली जाते. ही एक सकारात्मक बाब आहे. मात्र शाळेत जाण्यापूर्वीचा काळ (६ ते ६ वर्षे) हे डोळ्यांतील असामान्यता ओळखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळेच नवजात बालकांच्या डोळ्यांच्या तपासणीबरोबरच पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. योग्य स्तनपान, डोळ्यांची तपासणी आणि ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास त्याचे लवकर निदान करणे हे नवजात बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तीन महत्त्वाचे घटक आहे.
- डॉ. कुलदीप डोळे, वैद्यकीय संचालक, एच. व्ही. देसाई आय रुग्‍णालय
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com