कोथरूडमधील उद्योजकाचा बिहारमध्ये खून
पुणे, ता. १५ : कोथरूडमधील एका उद्योजकाचा बिहारमध्ये खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या उद्योजकास ‘सायबर बिझनेस ट्रॅप’ रचून बोलावून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पाटणा एअरपोर्ट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, १७ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५, रा. डी. पी. रस्ता, कोथरूड) असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. शनिवारी (ता. १२) जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मननपूर गावाजवळ रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. सोमवारी (ता. १४) मृतदेहाची ओळख पटली असून, ते पुण्यातील उद्योजक लक्ष्मण शिंदे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण शिंदे यांची खेड शिवापूर येथे ‘रत्नदीप सेंट्रिफ्युगल कास्टिंग बेअरिंग कंपनी’ आहे. त्यांची सेंट्रिफ्युगल कास्टिंगसंबंधी शिवराज सागी नावाच्या व्यक्तीशी फोन आणि ई-मेलवर व्यावसायिक चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांना पाटणा येथे बोलावण्यात आले. ११ एप्रिलला शिंदे विमानाने पाटणा येथे गेले. तेथे पोहोचल्यानंतर ते मुलीशी फोनवर बोलले. त्यांनी रात्री साडेआठ वाजता व्हॉट्सॲपवर संदेशही पाठविला. त्यात ‘मी आता झारखंडला कोळसा खाणीत प्लांट क्रमांक तीनमध्ये १२०० फूट खाली मशिन आणि साधने पाहण्यासाठी जात आहे. एकूण सात प्लांट्स आहेत, जे केंद्र सरकारअंतर्गत कोल इंडिया लि.मार्फत चालवले जातात,’ असे म्हटले होते. परंतु त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे १२ एप्रिलला कोथरूड पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे कोथरूड पोलिसांचे पथक पाटणा येथे पाठवण्यात आले. शिंदे यांचे पाटणा विमानतळाबाहेर अपहरण झाले. त्यानंतर नालंदा, गया आणि पाटणा परिसरात फिरवण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
सायबर बिझनेस ट्रॅप रचून खून
सायबर बिझनेस ट्रॅपमध्ये आरोपी विमानतळावरून लोकांना फसवून बोलावतात. त्यांना दुर्गम भागातील शेतामध्ये डांबून ठेवतात, त्यांच्या बँक खात्यांमधून पैसे उकळतात. उद्योजक लक्ष्मण शिंदे यांना सायबर बिझनेस ट्रॅप रचून व्यवसायाच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यांच्या बॅंक खात्यातून जबरदस्तीने ९० हजार रुपये काढून घेण्यात आले. या खून प्रकरणात तेथील पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवून १७ संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

