

पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ११ : कधी रस्ता रुंदीकरण तर, कधी विकासकामे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे झाडांच्या मुळावर घाव बसतो. ‘झाडांचे पुनर्रोपण’ या गोंडस नावाखाली पुनर्रोपणाचा काहीसा प्रयत्न होतो, मात्र त्यामध्ये झाडे जगण्याचे प्रमाण अत्यल्प असते. हे चित्र बदलण्यासाठी बाधित झाडे १०० टक्के जगतील, यादृष्टीने झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शास्त्रीय पद्धतीने झाडांचे पुनर्रोपण करण्याच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेकडून ५० झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. त्यानंतर विविध प्रकल्पांमधील बाधित झाडांचे पुनर्रोपण करण्यावर भर दिला जाणार आहे.
रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प, मुळा - मुठा नदी सुधार प्रकल्प, गृहप्रकल्पांसह विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांची कत्तल करण्यावर भर दिला जातो. मात्र कायद्याच्या बंधनामुळे प्रकल्पांमधील बाधित झाडांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रकल्पांमधील वृक्षांचे खोड एखाद्या ठिकाणी नेऊन त्याचे पुनर्रोपण केल्याचे दाखविले जाते. प्रत्यक्षात संबंधित झाड जगविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे झाडांच्या पुनर्रोपणाचा प्रकार हा दिखाऊपणा असल्याचे स्पष्ट होते. महापालिका प्रशासनाकडून देखील याच पद्धतीने पुनर्रोपणाचे काम केले जाते. परिणामी झाडे जगण्याचे प्रमाण कमी आहे.
महापालिकेकडून मुळा - मुठा नदी सुधार प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्यावर भर दिला जात आहे. मात्र हे पुनर्रोपण करताना संबंधित झाडे १०० टक्के जगतील, यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, विशेष प्रकल्प विभागाकडून पुनर्रोपण करण्यात येणारी झाडे शास्त्रीय पद्धतीचा वापर करून जिवंत राहतील, यासाठी प्रयत्न केला जात आहे.
अशी घेणार काळजी
- पर्यावरणप्रेमी, वृक्ष अभ्यासक, वनस्पती तज्ज्ञ यांच्यासह एका संस्थेची घेणार मदत
- पुनर्रोपणानंतर झाडांची दोन महिने काळजी घेतली जाणार
- झाडांना नियमितपणे खत, पाणी दिले जाणार
याठिकाणी होणार पुनर्रोपण
नदी सुधार प्रकल्पातील बाधित ५० मोठ्या झाडांचे शास्त्रीय पद्धतीने पुनर्रोपण केले जाणार आहे. या प्रकल्पातील संगमवाडी (स्ट्रेच ९) व कोरेगाव पार्क (स्ट्रेच १०) या ठिकाणी झाडांचे पुनर्रोपण केले जाणार असल्याची माहिती विशेष प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे, उपअभियंता मुकुंद शिंदे यांनी दिली.
मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा
शास्त्रीय पद्धतीने झाडांचे पुनर्रोपण करण्याबाबत महापालिकेत कार्यशाळा घेण्यात आली. त्यात महापालिकेच्या विशेष प्रकल्प, पथ, मलनिस्सारण, भवन, उद्यान विभागासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वनस्पतीतज्ज्ञ श्रीकांत इंगळहळ्ळीकर, पानसरे नर्सरीचे संचालक बाळकृष्ण पानसरे, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी मार्गदर्शन केले.
नदी सुधार प्रकल्पासह विविध प्रकल्पातील बाधित झाडांचे पुनर्रोपण चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी शास्त्रीय पद्धतीने पुनर्रोपण करण्यावर भर दिला आहे. या उपक्रमासाठी शहरातील पर्यावरण व वृक्ष प्रेमी, वनस्पती तज्ज्ञ, अभ्यासक यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. सर्वांच्या प्रयत्नातून पुनर्रोपण होणारी झाडे १०० टक्के जगतील. यासाठी प्रयत्न केला जात आहे.
- युवराज देशमुख, मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.