

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १० : ‘सीबीएसई पॅटर्न’नुसार इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके नेमकी हातात कधी पडणार?, खुल्या बाजारपेठेत ही नवी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी कधी येणार? या प्रतीक्षेत तुम्ही आहात का? तर राज्य मंडळाची ‘सीबीएसई’ पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. या नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकाचे वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे, तर खुल्या बाजारपेठेत जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता पहिलीची नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके येणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्याची सुटी संपत असतानाच आणि शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी-पालकांना ही नवी पाठ्यपुस्तके हातात मिळणार आहेत.
राज्य मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार असल्याने आता पालकांमध्ये इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके कधी मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. एकीकडे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक अद्यापही नव्या अभ्यासक्रमावर चर्चा करत आहेत, तर दुसरीकडे ‘सीबीएसई’ पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तके नेमकी हातात कधी येणार?, याच्या प्रतीक्षेत लाखो पालक असल्याचे चित्र आहे. मात्र, पालकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
राज्य सरकारने ‘सीबीएसई’ पॅटर्ननुसार अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने या निर्णयानुसार इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम तयार केला. या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्याचे काम बालभारतीमार्फत सुरू आहे. बालभारतीमार्फत टप्प्याटप्प्याने विषयनिहाय पाठ्यपुस्तकांची पडताळणी करून ती अंतिम करण्यात येत आहेत. अंतिम झालेल्या पाठ्यपुस्तकांची छपाई केली जाते. अशाप्रकारे टप्प्या-टप्प्याने पाठ्यपुस्तके अंतिम करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत इयत्ता पहिलीच्या सर्व पाठ्यपुस्तकांची छपाई पूर्ण होईल आणि त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्वांत पहिल्यांदा समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण त्या-त्या डेपोमधून करण्यात येईल. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात खुल्या बाजारपेठेत विक्रीसाठी मागणीनुसार पाठ्यपुस्तके पाठविण्यात येतील, असे ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नव्याने छपाई झालेल्या पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या वितरणाची प्रक्रिया त्या-त्या डेपोतून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात समग्र शिक्षा अभियानातील मोफत वितरित करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचे जिल्हा, तालुका, विषय, माध्यमनिहाय वितरण करण्यात येईल, तर ही नवी पाठ्यपुस्तके खुल्या बाजारात जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि शाळा सुरू होण्यापूर्वी विक्रीसाठी उपलब्ध होतील.
- कृष्णकुमार पाटील, संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.