पावसाळ्यात सांभाळा मुलांचे आरोग्‍य

पावसाळ्यात सांभाळा मुलांचे आरोग्‍य

Published on

पुणे, ता. ३ : मॉन्सून किंवा पाऊस जसे चैतन्‍य घेउन येतो तसेच रोगराईलासुध्‍दा कारणीभूत ठरतो. पावसाळ्याच्या आगमनानंतर ॠतूबदल होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, डेंगी, हंगामी फ्लू, अतिसार अशा संसर्गजन्य आजारांचे प्रमाण लहान मुलांमध्ये लक्षणीय वाढते. लवकरच शाळाही सुरू होत असल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्‍याचे मत बालरोगतज्ज्ञांनी व्‍यक्‍त केले आहे.

पावसाळ्यात आजार पसरण्याचा वेग अधिक असतो. मुलांना झालेला साधा सर्दी - खोकलाही इतर मुलांमध्ये सहज पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांनी गरज पडल्‍यास मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, हात वारंवार धुणे आणि खोकताना तोंड झाकणे या सवयी अंगीकारणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढते. यामुळे डेंगी आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढतो. डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, झाडांच्या कुंड्या, फ्रिज मागील ट्रे, पाळीव प्राण्यांचे पाण्याचे भांडे इत्यादी नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे, असे बालरोगतज्‍ज्ञ सांगतात.

सद्यःस्थितीत काही भागांमध्ये कोरोनाच्या नव्या उपप्रकारांचे रुग्ण आढळत असल्याने त्याबाबतीतही सतर्कता आवश्यक आहे. ताप, घशात दुखणे, खोकला अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पावसाळ्यात त्‍वचेच्‍या आजारांचे प्रमाण वाढते. ओले कपडे घातल्‍याने त्‍याचा प्रसार व वाढ होते. हे टाळण्‍यासाठी अंग कोरडे करावे. ओले अंतर्वस्त्रे घालू नयेत. कपडे सूर्यप्रकाशात वाळवावेत.

संसर्गजन्‍य आजारांचा धोका
या काळात दूषित पाणी आणि अन्नामुळे अतिसार, उलट्या यांसारखे पोटाचे आजार होतात. न्यूमोनिया, बालदमा असे श्वसनाचे विकार देखील होऊ शकतात. त्यामुळे मुलांना नेहमी स्वच्छ आणि उकळलेले पाणी द्यावे. बाहेरील अन्न, फास्ट फूड टाळावे. घरचे अन्नपदार्थ, ताजी फळे, भाज्या, दूध यांचा समावेश असलेला संतुलित आणि पौष्टिक आहार द्यावा. शाळा सुरू होण्यापूर्वीच मुलांचे लसीकरण पूर्ण झाले असल्यास संसर्गाचा धोका बऱ्याच अंशी टाळता येतो.

आजारांपासून बचावासाठी अशी घ्या काळजी
- स्वच्छता पाळा
- उकळलेले व स्वच्छ पाणी द्या
- रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फळे, भाज्या, दूध, डाळी असा पौष्टिक आहार द्या
- डासांचे निर्मूलन करा
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इन्फ्लुएन्झा व टायफॉईडसारख्या लसी घेणे फायदेशीर ठरते
- पावसात भिजल्यानंतर लगेच कपडे बदलावेत
- गरज नसल्यास सार्वजनिक ठिकाणे जाणे टाळा
- स्वतः उपचार न करता वैद्यकीय सल्ला घ्या

आजारांपासून वाचण्यासाठी मुलांनी व त्यांच्या पालकांनी स्वच्छतेचे नियम पाळणे, लसीकरण वेळेवर करून घेणे आणि आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आरोग्याबाबतची थोडीशी सतर्कता मुलांचे गंभीर आजारांपासून संरक्षण करू शकते. लक्षणे दिसताच बालरोगतज्‍ज्ञांचा सल्ला घेणे आणि उपचार वेळेवर करणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. स्मिता सांगडे, बालरोगतज्‍ज्ञ, कमला नेहरू रुग्‍णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com