मंगळ-मघाची देखणी युती

मंगळ-मघाची देखणी युती

Published on

आकाशदर्शन
- डॉ. प्रकाश तुपे

येत्या १७ जूनला संध्याकाळी पश्चिम क्षितीजावर मंगळ ग्रह मघा ताऱ्याशी युती करेल. यावेळी या दोघांमधील अंतर अवघे ०.७ अंश असेल. या दोघांची तेजस्विता साधारणपणे समान असल्याने दुर्बिणीतून पाहता ते द्वैती ताऱ्याप्रमाणे दिसतील. मंगळ नारिंगी रंगाचा तर मघा निळसर शुभ्र रंगाचा दिसेल. जरी हे दोघे एकमेकांजवळ दिसत असले तरी प्रत्यक्षात मघा तारा ८० प्रकाशवर्षे दूर असल्याने तो मंगळापेक्षा २.७ दशलक्ष पट दूर आहे. मंगळ आपल्या सूर्य मालेतील पृथ्वीसारखा छोटा ग्रह तर मघा सिंह राशीतील मोठा व तेजस्वी तारा आहे. मघा ताऱ्याची तेजस्विता प्रत्यक्षात आपल्या १५० सूर्याएवढी आहे. पुढील वर्षी २६ नोव्हेंबरला पुन्हा या दोघांची युती होईल.

ग्रह :
बुध : गेल्या महिन्याच्या अखेरीस बुध सूर्याजवळ होता. आता तो सूर्यापासून दूर होत उत्तर पश्चिम क्षितीजावर दाखल होत आहे. तो महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सूर्यास्तानंतर दीड तासापासून दिसू लागेल. यावेळी त्याची तेजस्विता उणे १ असेल. बुध सूर्यापासून दूर होताना ८ जूनला गुरूजवळ पोहचेल तर मिथुन राशीच्या इप्सीलॉन ताऱ्याजवळ १४ जूनला दिसेल. बुध क्षितीजावर उंच चढताना २४ तारखेला मिथुन राशीच्या कश व प्लव ताऱ्यांच्या ओळीत पोहचेल. याच परिसरात चंद्रकोर २६-२७ तारखेला पोहचत आहे. सूर्यास्तानंतर दीड-दोन तासापर्यंत या चार ग्रहगोलांचे संमेलन पाहता येईल.

शुक्र : सूर्योदयापूर्वी सुमारे तीन तास पूर्वेस तेजस्वी शुक्र उगवताना दिसेल. तो मीन राशीत असून त्यानंतर मेषेत व शेवटी वृषभ राशीत दिसू लागेल. यावेळी तो कृत्तिका व रोहिणीच्या परिसरात असेल. दुर्बिणीतून पाहता महिन्याच्या सुरूवातीस शुक्राचे बिंब २३ विकलांचे दिसेल व महिनाअखेरीस १८ विकलांएवढे छोटे दिसू लागेल. त्याच्या बिंबाचा प्रकाशित भाग ५० टक्क्यांपासून ८३ टक्क्याएवढा वाढेल. शुक्र पृथ्वीपासून दूर जात असल्याने त्याचे रूप बदलताना दिसत आहे. असे असले तरी त्याची तेजस्विता फारशी न बदलता ती उणे ४.२ राहील. चंद्रकोरीजवळ शुक्र २२ जूनला दिसेल.

मंगळ : पश्चिम क्षितीजावर रात्री ११-१२ पर्यंत नारिंगी रंगाचा मंगळ सिंह राशीत दिसेल. गेल्या महिन्याच्या अखेरीस मंगळ मघा ताऱ्यापासून ९ अंशावर दिसत होता. या महिन्यात तो मघाकडे सरकत १६ ते १८ तारखेला मघेजवळून जाताना दिसेल. या दोघांतील अंतर १७ तारखेला अवघे ०.७ अंश इतके कमी होईल. या दोघांपैकी मघा किंचित तेजस्वी तर मंगळ १.३ तेजस्वितेचा असेल. मंगळाच्या नारिंगी रंगामुळे त्याला ओळखणे सोपे जाईल. या परिसरात चंद्र २८ जूनला पोहचेल.

गुरू : पश्चिम क्षितीजावर संध्याकाळी सव्वासातपासून गुरू दिसू लागेल. तो महिन्याच्या प्रारंभी सव्वाआठ वाजता मावळेल. गुरू सूर्याकडे सरकत असल्याने लवकर मावळेल. यामुळे या महिन्यात गुरू सहजपणे दिसू शकणार नाही. त्याची सूर्याबरोबर युती २४ जूनला होईल. युतीनंतर तो जुलैच्या अखेरीस पूर्व क्षितीजावर दिसू लागेल.

शनी : पिवळसर रंगाचा शनी महिन्याच्या प्रारंभी पूर्वेस रात्री दोनच्या सुमारास उगवताना दिसेल. महिन्याभरात लवकर उगवत जात महिनाअखेरीस रात्री सव्वाबारा वाजता उगवताना दिसेल. शनी मीन राशीच्या मंद ताऱ्याच्या परिसरात पूर्वेकडे सरकताना दिसेल. दुर्बिणीतून पाहता शनीचे बिंब १७ विकलांचे दिसेल. नुकतीच शनीची कडी दिसेनाशी झालेली आपण पाहिली. आता ती उमलू लागलेली दिसतील. या महिन्यात ती ४ अंशाने कललेली दिसतील. आता आपल्याला या कड्यांचा दक्षिणेकडचा भाग पुढील १३ वर्षे दिसत राहील. या महिन्याच्या अखेरीस शनीजवळ नेपच्यूनला पाहता येईल. चंद्राजवळ शनी १९ जूनला दिसेल.

युरेनस-नेपच्यून : युरेनसची नुकतीच सूर्याबरोबर युती झाल्याने तो दिसू शकणार नाही. या महिन्यात नेपच्यूनला पाहण्यासाठी शनीची मदत होईल. शनीच्या जवळच डाव्या हातास निळसर रंगाचा नेपच्यून दिसेल. यावेळी या दोघांतील अंतर अवघे १ अंश असेल. शनीची तेजस्विता १.० असेल तर नेपच्यून त्यापेक्षा मंद म्हणजे ७.८ तेजस्वितेचा दिसेल.


चंद्र-सूर्य : ज्येष्ठ पौर्णिमा ११ जूनला तर अमावस्या २५ जूनला होईल. चंद्र पृथ्वीपासून दूर (४,७५,५५३ कि.मी.) ७ जूनला तर पृथ्वीजवळ (३,६३,१७९ कि.मी.) २३ जूनला असेल. सूर्य २१ जूनला ‘विष्टंभ’ स्थानावर पोहचेल. यादिवशी तो कर्क वृत्तावर असेल. तो जास्तीत जास्त उत्तरेस असल्याने उत्तरगोलार्धात मोठ्यात मोठा दिवस असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com