फेरीवाल्यांना प्रमाणपत्र वाटप सुरू

फेरीवाल्यांना प्रमाणपत्र वाटप सुरू
Published on: 

पिंपरी, ता. २१ ः पदपथांसह रस्ते व सार्वजनिक ठिकाणची अतिक्रमणे हटवण्यासाठी आणि हॉकर्स झोन निर्मितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने २०२२ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यातील पथारी, टपरी, हातगाडी, फिरत्या विक्रेते आदी पात्र लाभार्थ्यांना बुधवारपासून (ता. २१) प्रमाणपत्र वाटप सुरू केले. शिवाय, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर हॉकर्ससाठी जागा शोधून निश्चित करण्याचे काम सुरू आहे. यामुळे तब्बल चार वर्षांनंतर शहरातील पथविक्रेता धोरणाला दिशा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांचे यापूर्वी २०१२, २०१४, २०१६ मध्येही सर्वेक्षण केले होते. मात्र, हॉकर्स झोनची कार्यवाही न झाल्याने २०२२ मध्ये पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, विक्रेत्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र अद्याप दिले नव्हते. शिवाय, अतिक्रमण किंवा अनधिकृत टपरी, पथारी, हातगाडी म्हणून कारवाई करून साहित्य जप्त केले जात होते. या कारवाईविरुद्ध आणि पथविक्रेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे व हॉकर्स झोन ठरवून सर्वेक्षणातील पात्र लाभार्थींना ओळखपत्र व प्रमाणपत्र देणे, यासाठी पथविक्रेता महासंघाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली. फेरीवाला प्रमाणपत्र व ओळखपत्रांचे वाटप तातडीने करण्यासह हॉकर झोन निश्चित करण्याचा आदेश न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिला होता. त्यानुसार आता महापालिकेने कार्यवाही सुरू केली असून शहरातील सर्व आठही प्रभागांमध्ये प्रमाणपत्र आणि ओळखपत्र वाटप सुरू केले आहे.

हॉकर्ससाठी हव्यात १२० ठिकाणी जागा
फेरीवाला महासंघाने शहरातील आठही (पूर्वीचे) क्षेत्रीय कार्यालयस्तरावर हॉकर्स झोन निर्मितीची मागणी केली होती. त्यासाठी प्रत्येक कार्यालय क्षेत्रात १५ याप्रमाणे शहरात १२० जागा निश्चित करण्याचे सूचविले होते. आता १० कार्यालये झाली असून त्या-त्या क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप महापालिकेने सुरू केले आहे.

दृष्टिक्षेपात २०२२ मधील सर्वेक्षण
सर्वेक्षणात आढळलेले फेरीवाले ः १९,७९२
व्यवसाय परवान्यासह पात्र ठरलेले ः १५०१३

पिंपरी चिंचवडमध्ये २०२२ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यातील पात्र लाभार्थींना ओळखपत्र व प्रमाणपत्र दिले जात आहे. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, ज, ल या दहाही क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील सर्व पात्र लाभार्थ्यांना २७ ऑक्टोबरपर्यंत प्रमाणपत्र वाटपाचे नियोजन आहे. हॉकर्स झोनसाठी जागा निश्चित केल्या जात आहेत.
- सीताराम बहुरे, उपायुक्त, भूमी जिंदगी विभाग, महापालिका

मी तीस वर्षांपासून चहा-नाश्ता विक्रीचा व्यवसाय करीत आहे. निगडीतील टिळक चौकालगत रस्त्याच्या कडेला टपरी होती. आता सर्वेक्षणानंतर प्रमाणपत्र मिळाले आहे. तीन वर्षांपासून मधुकरराव पवळे उड्डाणपुलाखाली आखून दिलेल्या गाड्यात व्यवसाय करीत आहे.
- इरफान चौधरी, पथारी व्यावसायिक, टिळक चौक, निगडी

सर्वेक्षणातील पात्र लाभार्थींना प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. अनेक वर्षांच्या विलंबानंतर प्रश्न मार्गी लागल्याने फेरीवाल्यांना दिलासा मिळाला आहे. प्रमाणपत्र आणि ओळखपत्रामुळे विक्रेत्यांच्या नोंदणीकृत व्यवसायाला अधिकृत ओळख मिळण्यास मदत होईल.
- काशिनाथ नखाते, अध्यक्ष, फेरीवाला महासंघ

‘अ’ व ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात कार्यक्रम
पिंपरी चिंचवडमधील पात्र फेरीवाल्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम अ व क क्षेत्रीय कार्यालयात बुधवारी झाला. त्याला क्षेत्रीय अधिकारी अनुक्रमे निवेदिता घागरे व अजिंक्य येळे यांच्यासह काशिनाथ नखाते, किरण साडेकर, राजू बिराजदार, अलका रोकडे, सलीम डांगे, इरफान चौधरी, बालाजी लोखंडे, सलीम शेख, नंदू आहेर, रज्जाक शेख, सुनील भोसले, सहदेव होनमने, सुखदेव नांगरे, इकबाल शेख, विशाल इचके, लक्षण सागर, ज्योती ढाकरे, अशोक पगारे, अनिता कुमार, सुषमा सागर आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com