

दररोज १६२ रूपये कमाई असलेल्यांनाच रेशनधान्य
ग्रामीण लाभार्थींसाठी १२१ रूपयांची अट; निकषामुळे ५३ हजार लाभार्थी अपात्र
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३० ः रेशन दुकानातून मोफत किंवा सवलतीच्या दरात धान्य मिळविण्यासाठी आता उत्पन्नाची कठोर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शहरातील लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये (दररोज १६२ रूपये), तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे उत्पन्न ४४ हजार रुपयांपर्यंत (दररोज १२१ रूपये) असणे आवश्यक आहे. यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांचे रेशनधान्य बंद केले जाणार आहे. चारचाकी वाहन असलेले तसेच सलग तीन ते सहा महिने धान्य न नेणारे लाभार्थीही अपात्र ठरणार आहेत.
केंद्र सरकारच्या ‘मिशन सुधार’ उपक्रमांतर्गत पात्रतेचे निकष तपासले जात आहेत. निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी जिल्हानिहाय पाठविण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील सुमारे ५३ हजार लाभार्थ्यांचे रेशनधान्य बंद करण्यात आले आहे. यामध्ये उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेले, प्राप्तिकर भरणारे, बनावट किंवा दुबार रेशनकार्डधारक आणि चारचाकी वाहन असलेल्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. अधिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांची माहिती प्राप्तिकर विभागाकडून घेण्यात आली आहे.
दरम्यान, दरवर्षी दिवाळीत रेशनकार्डधारकांना दिल्या जाणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’बाबत यंदा निर्णय झालेला नाही. दुष्काळी परिस्थिती असतानाही दिवाळी किटचे वाटप होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा केवळ अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला एक किलो साखर दिली जाणार आहे. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना साखर मिळणार नाही.
----------------------------------------
अंत्योदय कुटुंबांनाच एक किलो साखर
दिवाळीत यंदा रेशनकार्डधारकांना राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा मिळणार नाही. अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य (२२ किलो गहू आणि १३ किलो तांदूळ) दिले जाते. याशिवाय २० रुपये किलो दराने एक किलो साखर मिळणार आहे. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दरमहा तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिला जाईल.
-------------------------------
सोलापूर जिल्ह्यातील पात्र रेशनकार्डधारकांसाठी दरमहा सुमारे सव्वालाख क्विंटल धान्याची गरज असते. त्यापैकी सोलापूर शहरासाठी २७ हजार क्विंटल धान्य लागते. लाभार्थी दरमहा ८० ते ८५ क्विंटल धान्य घेऊन जातात, तर उर्वरित धान्य काही दिवसांनी घेतले जाते, असे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.
-------------------------------
कोट
शहरातील रेशनधान्य लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये, तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे उत्पन्न ४४ हजार रुपये अपेक्षित आहे. चारचाकी वाहन असलेले आणि सलग तीन ते सहा महिने रेशनधान्य न नेणाऱ्या लाभार्थ्यांचे धान्य कायमचे बंद केले जात आहे. ‘मिशन सुधार’अंतर्गत केंद्र शासनाकडून अशा लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे.
— ओंकार पडोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर
---------------------------
सोलापूर शहरातील स्थिती
तपशील संख्या
अंत्योदय व प्राधान्यक्रम लाभार्थी ५,१९,४६३
वार्षिक उत्पन्न मर्यादा ५९,००० रुपये
धान्य बंद होणारे लाभार्थी ५३,०००
ई-केवायसी न केलेले लाभार्थी १ लाख
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.