

प्रज्वल रामटेके : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) बहुचर्चित ‘गट-ब संयुक्त’ आणि ‘राज्यसेवा’ परीक्षांच्या मुख्य परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे आणि आर्थिक नियोजन कोलमडले असून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आयोगाने दोन्ही परीक्षांचे सुधारित वेळापत्रक तात्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांना पुढील तयारीसाठी स्पष्ट दिशा द्यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केली आहे.
यासंदर्भात ‘एमपीएससी’चे अतिरिक्त अध्यक्ष सतीश वाघोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास आणि अधिक माहिती देण्यास नकार दिला.
आयोगामार्फत ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ ही १४ जूनला घेण्यात आली होती. या परीक्षेची मुख्य परीक्षा पाच डिसेंबरला नियोजित होती. तसेच ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ अर्थात राज्यसेवा पूर्व परीक्षा ३१ मार्चला झाली होती. या परीक्षेची मुख्य परीक्षा तीन ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. मात्र, विविध कारणांमुळे या दोन्ही मुख्य परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आता पुढे नेमके काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘‘पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी मुख्य परीक्षेच्या संभाव्य तारखांनुसार अभ्यासाचे नियोजन करतात. विषयांची उजळणी, लेखनाचा सराव, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि मार्गदर्शन वर्गांचे वेळापत्रक निश्चित केले जाते. मात्र, परीक्षा कधी होणार, याची स्पष्टता नसल्याने अभ्यासाचे नियोजनही करता येत नाही. त्यातच विद्यार्थ्यांना घरभाडे, भोजन, अभ्यासिकांचे शुल्क आणि इतर खर्चांचा भार सहन करावा लागत आहे. परीक्षा लांबल्याने हा खर्च आणखी किती काळ करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. त्यामुळे आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा.’’
पुण्यामध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे अत्यंत खर्चिक आहे. आता परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे गेल्यामुळे पालकांकडे आणखी किती महिने पैसे मागायचे, हा मोठा प्रश्न आहे. आयोगाने किमान संभाव्य तारखा तरी सांगाव्यात, जेणेकरून आम्हाला नियोजन करता येईल.
- संभाजी शिंदे, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
पूर्व परीक्षा दिल्यानंतर आम्ही मुख्य परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाची एक विशिष्ट लय (रिदम) पकडली होती. कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, हे ठरले होते. मात्र, अचानक परीक्षा पुढे ढकलल्याने ही लय पूर्णपणे तुटली आहे. वेळापत्रक नसल्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे. आयोगाने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही विचार करावा.
- आसिफ सय्यद, स्पर्धा परीक्षा विद्यार्थिनी
परीक्षा पुढे गेल्यामुळे अनेक मुलांनी नैराश्यातून गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासिका आता निम्म्याहून अधिक रिकाम्या झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे आणि दुसरीकडे हाती काहीच लागत नाही, अशी स्थिती आहे. आयोगाने नवीन वेळापत्रक देऊन या अनिश्चिततेला पूर्णविराम द्यावा.
- विक्रम भोसले, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.