

फोटो - PNE26W28995
PNE26W28996
...
भारत मातेच्या सेवेत
सागर-आकाश कवेत
- रोहिदास किसन गायकवाड
सेवानिवृत्त वैज्ञानिक अधिकारी, परमाणू ऊर्जा विभाग, मुंबई
लिड
...
आगडगाव डोंगरात असलं, तरी त्याची कीर्ती आता सातासमुद्रापार आहे. श्री भैरवनाथांची महतीमुळं हे शक्य झालं. मला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला, त्या वेळी गावचं नाव घेतलं गेलं. विचारलं गेलं. दिल्लीत आपल्या गावाचं नाव गाजलं, याचे अप्रूप वाटलं. तो क्षण आजही हृदयात कोरून ठेवलाय. गावातील मुलांनी मोठी स्वप्न पहावीत. माझ्यासारखं वैज्ञानिक होऊन गावाचं नाव उज्ज्वल करावं, असं मनोमन वाटतं.
....
गावात आमच्या गायकवाड कुटुंबीयांची अनेक घरे आहेत. माझं प्राथमिक शिक्षण गावात झालं. त्या वेळी शाळेच्या केवळ दोन खोल्या होत्या. एका खोलीत शिक्षक बसत. दुसऱ्या खोलीत पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग भरत. एका शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी असायची. चौथीच्या वर्गात फक्त चार विद्यार्थी होते. अशा अत्यंत मर्यादित साधनसामग्रीत माझा शिक्षणप्रवास सुरू झाला. माध्यमिक शिक्षणासाठी जेऊरला मामाच्या गावी गेलो. ८ वी ते ११ वीपर्यंतचे शिक्षण जेऊरच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयात पूर्ण झाले. या काळात शैक्षणिक गुणवत्तेमुळे त्यांना ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून माझा गौरव झाला.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी नगरच्या अहमदनगर महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मराठी माध्यमातून पूर्वीचे शिक्षण झाल्याने इंग्रजी जरा जड जायचे. मी कॉमर्स शाखेत जाण्याचा विचार केला. मात्र, पहिल्याच त्रैमासिक परीक्षेत गणित विषयात मला प्रथम क्रमांक मिळवला. या यशामुळे आत्मविश्वास वाढला. विज्ञान शाखेतच राहून प्रथम श्रेणीत पदवी मिळविली.
पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच माझी निवड भारत सरकारच्या नामांकित संशोधन केंद्रात सहायक वैज्ञानिक म्हणून झाली. वैज्ञानिक अधिकारी म्हणून देशसेवा करत असताना उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन भारत सरकारने घेतली. मला राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते एक्सलन्स इन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी’ हा पुरस्कार मिळाला. हा माझ्या जीवनातील व आगडगावच्या मातीचा सर्वोच्च पुरस्कार म्हणावा लागेल.
मी मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्रात दीर्घकाळ सेवा केली. आता सेवानिवृत्त आहे. माझ्या सेवाकाळातील योगदानाचा मला अभिमान वाटतो. या संपूर्ण प्रवासात पत्नी भारती यांची मोलाची साथ लाभली. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी समर्थपणे सांभाळली. त्यामुळेच दोन्ही मुले सागर आणि आकाश आज उच्च पदांवर कार्यरत आहेत. मोठा मुलगा सागर अमेरिकेत एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक आहे. स्नूषा स्नेहा त्याच कंपनीत कार्यरत आहे. धाकटा मुलगा आकाश कॅनडा सरकारच्या रेल्वे विभागात उच्च पदावर कार्यरत आहे आणि स्नूषा प्राजक्ता हाय कमिशन आॅफ इंडियामध्ये व्हिसा आॅफिसर आहे.
माझं जीवन अत्यंत साध्या आणि बेताच्या आर्थिक परिस्थितीत सुरू झालं. वडील शेतकरी होते. एकत्र कुटुंब पद्धतीत आठ-दहा भावंडांचं शिक्षण चालू असताना संपूर्ण कुटुंबाने मोठा संघर्ष केला. वडिलांनी कुटुंबप्रमुख म्हणून परिस्थितीशी दिलेला लढा माझ्या जीवनाला दिशा देणारा ठरला.
महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात आर्थिक अडचणींमुळे १९७२ साली मी गावातील पाझर तलावाच्या कामावर जात असे. त्या श्रमातून मिळालेला छोटासा वाटा आजही अभिमानाचा वाटतो. कारण तोच तलाव आज गावासाठी जीवनदायी ठरला आहे. त्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे शैक्षणिक प्रवास म्हणजे अथांग समुद्रात भरकटलेल्या नौकेसारखा होता. मात्र, प्रयत्न, चिकाटी आणि नशिबाच्या साथीने यशाचा किनारा गाठला. आज निवृत्तीनंतरही मनोमन समाधान आहे.
त्या काळात ना गुगल होते, ना यूट्यूब. मार्ग दाखवणारं फारसे कोणी नव्हतं. पण इच्छाशक्ती, कष्ट आणि चिकाटी यांच्या जोरावर अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल केली. माझा प्रवास म्हणजे भरकटलेल्या नौकेला अखेर किनारा मिळण्याची कहाणी आहे, असं मला वाटतं.
आज निवृत्तीनंतर मागे वळून पाहताना एकच गोष्ट जाणवते, ‘परिस्थिती कितीही कठीण असली, तरी आत्मविश्वास आणि मेहनत असेल, तर यश नक्की मिळते.’ शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर जीवनात अनेक संधींची दारे उघडली. याच शिक्षणाच्या बळावर केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रवास आणि अनुभव घेण्याची संधी मिळाली. भारतासह नेपाळ, अमेरिका, कॅनडा, दुबई, केनिया, टांझानिया, सौदी अरेबिया, कतार इत्यादी अनेक देशांना भेट देण्याचा योग आला.
या प्रवासातून विविध संस्कृती, तंत्रज्ञान आणि प्रगतीचे नवे पैलू पहायला मिळाले. विशेष म्हणजे अमेरिकेतील नासा आणि केनियातील स्पेस सेंटरला भेट देणे, हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरला. या ठिकाणी पाहिलेली विज्ञानातील प्रगती आणि संशोधनाची उंची यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाला अधिक बळ मिळालं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.