

सकाळ - सप्तरंग, ता. २८ जून २०२६ साठी...
--------------------------------------------------------------------------------
सदर : राशिभविष्य
(२८ जून ते ४ जुलै २०२६)
लेखक : श्रीराम भट
---------------------------------------------------------------------------------
शीर्षक :
जीवननिष्ठा बळकट करू या...
---------------------------------------------------------------------------------
विश्व हे अखंड आणि नित्य स्पंदनशील आहे आणि या स्पंदनशीलतेशी श्रीगणेशांचा संबध जसा आहे, तसाच आपल्या संस्कृतीत वडाच्या वृक्षाचाही या अखंड स्पंदनशीलतेशी संबंध जोडण्यात येतो. भगवद्गीतेतही भगवंतांनी पंधराव्या अध्यायात या आकाशात मूळ असलेल्या किंवा ते मूळ धरून राह्यलेल्या अश्वत्थाचे मूलभूत चिंतनच केले आहे. या आद्य चिंतनाशी जवळीक साधणे किंवा त्याच्याशी जवळीक साधून राहणे हीच जीवात्म्याची साधना म्हणता येईल!
देवाचिये द्वारी उभा क्षण भरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेण्या ।।
या ज्ञानेश्वरांच्या अभंगातून, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा चार मुक्ती जीवात्मा परमेश्वराच्या चिंतनातून अनुभवत, त्या मूळ चैतन्याशी समरस होत असतो. गंमत म्हणजे या मुक्तींचा अधिष्ठाता श्रीगणेशच होय. श्रीगणपती अथर्वशीर्ष या मुक्तींशी जवळीक साधत मनोलय साधून घेण्याचा मार्ग दाखवते. ज्ञानेश्वरीत हीच ती श्रीगणेश विद्या गुप्तपणे पदोपदी वर्णिली आहे आणि हाच तो माणसाच्या आत्मचिंतनाचा मार्ग होय. माणसाच्या जीवनातील क्षण हा एक चिंतनाचाच भाग म्हणता येईल. उदा. एखादी हृदयस्थ प्रिय व्यक्ती भेटली की माणूस काळ विसरतो किंवा त्या भेटीचा क्षण अनंत स्वरूपाचे दर्शन घडवत असतो.
तैसा मी एकवांचनि काही । तया तयाही सकट नाही ।।
हे चौथी भक्ति पोही । माझी तो ताहे ।।
ये र आर्त जिज्ञासा अर्थार्थी । हे भजती जिये पंथी ।
ते तिन्ही पावोनि चौथी । म्हणिपत आहे ।।
एऱ्हवी तिजी ना चौथी । हे पहिली ना सरती ।
पै माझिये सहजस्थिती । भक्ति नाम ।।
मित्र हो, सप्ताहात होणारी वटपौर्णिमा आणि त्यानंतर ३ जुलैच्या शुक्रवारची संकष्टी चतुर्थी हेच सांगत आहे, की मूळ चैतन्याशी अर्थातच आत्मचैतन्याशी एकरूप होत, माणसाने जणू आत्मरूप परमात्म्याशी जवळीक साधत, पतिव्रतेसारखेच व्रत अंगीकारून परमात्म्यात लीन होऊन, त्याची भक्ती करावी, हीच जीवनसाधना होय. सध्याचे पुष्य नक्षत्रातील गुरूचे भ्रमण हाच जीवनसाधनेचा मार्ग दाखवत आहे. त्यामुळेच या सप्ताहातील संकष्टीचा चंद्रोदय पाहून आपण आपली जीवननिष्ठा अश्वत्थासारखी बळकट करू या!
जीवनात सूर गवसेल
मेष : सप्ताहातील वटपौर्णिमेचे प्रभावक्षेत्र छान सुसंगत असा ट्रॅक ठेवेल. प्रत्येक गोष्टीत माणसांच्या मदतीचा हात पुढे राहील. अश्विनी नक्षत्र व्यक्ती सतत सुवार्तांच्या फ्लॅशन्यूज देणार आहेत. भरणी नक्षत्रास शिक्षण, नोकरी आणि विवाह माध्यमांतून चांगलेच प्युअर सीक्वेन्स लागतील. अर्थातच हुकमी यशातून वाटचाल होईल. ता. ३ जुलै २६ ची शुक्रवारची संकष्टी चतुर्थी अनेकांचे नवस फेडणारीच राहील. नवपरिणीत तरुणांचा मोठा जल्लोष राहील. घरात मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. कृत्तिका नक्षत्रास जीवनातील चांगलाच सूर गवसेल. चैनीवर खर्च कराल. प्रेमविवाह मार्गस्थ होतील.
चोरीपासून सावध राहावे
वृषभ : राशीतील मंगल-हर्षल सहयोग पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात विचित्र खर्चाचे प्रसंग आणेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी उत्सव समारंभ, गर्दीची ठिकाणे आणि पर्यटनस्थळी चोरी वा नुकसानीच्या प्रसंगापासून सतत सावध राहावे. बाकी सप्ताहातील बुध आणि गुरू यांची वाटचाल आणि पौर्णिमेच्या सप्ताहातील शुक्रभ्रमण तारुण्य फुलवेलच. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यावसायिक विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ होतील. विशिष्ट सरकारी वटहुकमांतून लाभ होतील. शत्रूंना जरब बसेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना संकष्टीचा शुक्रवार मोठ्या सुवार्तांची परंपरा ठेवेल. काहींना नोकरीत अनपेक्षित बढतीचा लाभ. काहींची कोर्ट प्रकरणांतून सुटका होईल. भावा-बहिणींचे भाग्योदय धक्का देतील.
बदली - पगारवाढ होईल
मिथुन : राशीतील पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र प्रचंड ऊर्जा देणारे राहील. विशिष्ट ध्येयधोरणे यशस्वी होतील. तरुणांना सप्ताह चढत्या क्रमाने शुभ फळे देईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून मोठे लाभ होतील. अर्थातच लक्ष्मी प्रसन्न राहील. बाकी सप्ताहात पौर्णिमेच्या प्रभावात वेंधळेपणा टाळावा. गर्दीची ठिकाणे सांभाळावीत. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र विशिष्ट गाठीभेटीतून धन्य करेल. नोकरीतील विशिष्ट मानसन्मान थक्क करेल. नोकरीतील कामाचा ताण कमी होईल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संकष्टी विशिष्ट नुकसानीचे संकट घालवेलच. काहींच्या शत्रूला अद्दल घडेल. नोकरीत योग्य बदली होईल. काहींची पगारवाढ होईल.
मानहानीची शक्यता संपेल
कर्क : सप्ताहातील वटपौर्णिमेच्या अनुषंगाने चंद्रकलांची उत्तमच स्पंदने राहतील. मनातील विशिष्ट किल्मिषे पार निघूनच जातील. विशिष्ट मानहानीची शक्यता निघून जाईल. अर्थातच विशिष्ट ग्रहण निघूनच जाईल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विशिष्ट विघ्ने पळून लावतील. ता. ३ जुलै २६ ची शुक्रवारची संकष्टी जीवन धन्य करणारीच ठरेल. पुनर्वसु आणि पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना दैवीसंपदाच प्राप्त होईल. मुलाबाळांवरचे अरिष्ट निघून जाईल. परदेशस्थ तरुणांच्या चिंता जातील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय शत्रुत्वाच्या झळा निघून जातील. आजचा रविवार दैवी प्रचितीचाच. शुक्रवारची संकष्टी व्यावसायिक मोठा भांडवलपुरवठा करणारी. काहींना योग्य भागीदार मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य लाभेल. मात्र प्रेमिकांनी सप्ताहात थट्टामस्करी सांभाळावी.
व्यवसायातील वादग्रस्त वसुली होईल
सिंह : सप्ताहातील पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात काहींना बुद्धिकौशल्य उपयोगी पडेल. काहींना नोकरीची शाश्वती मिळेल. मात्र सप्ताहात नोकरदारांनी वरिष्ठांशी वागताना आचारसंहिता पाळावी. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीत हाताखालच्या नोकर वर्गाशी जपून वागावे. वागण्या बोलण्यातील प्रतिक्रिया जपाव्या. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या अनुषंगाने चंद्रकलांच्या माध्यमातून शुभ ग्रहांची रसद निश्चितच खेचून घेता येईल. सप्ताहातील मंगळवार आणि बुधवार याचीच प्रचिती देईल. सप्ताहाच्या शेवटी उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीतील रजेचा छान आनंद लुटतील. निसर्गसौंदर्याचा आनंद लुटाल. काहींना जुने मित्रमैत्रिणी भेटतील. काहींची विशिष्ट वादग्रस्त व्यावसायिक वसुली होईल.
नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कन्या : सध्या आपल्या राशीला ग्रहांचे मोठे फिल्ड मोठे अनुकूलच राहत आहे. अनुभवी माणसे त्याचा उत्तम लाभ उठवतच आहे. या पौर्णिमेच्या सप्ताहात चांगलेच अनुभव संपन्न होणार आहेत. पौर्णिमेची दिव्य स्पंदने घेऊन, शुक्रवारच्या संकष्टीचा चंद्रोदय पाहणार आहात. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातील मोठ्या अडचणींवर विजय मिळवणार आहेत. ता. १ ते ३ हे दिवस जीवनातील मोठे सीक्वेन्स लावून देतील. अर्थातच शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून उत्तरा नक्षत्रास बुधवारचा सूर्योदय मोठ्या सुवार्तांतून थक्क करेल. नोकरीतील ताण कमी होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार महत्त्वाच्या गाठीभेटी यशस्वी करून देईल. शुक्रवारचा संकष्टीचा चंद्रोदय प्रेमिकांची प्रीत जागवेल.
मूर्खाचा सहवास टाळावाच
तूळ : सप्ताहातील पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर ऑनलाइन क्लिक होणारेच. तरुणांनी नोकरीच्या मुलाखतींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह अंगभूत कलागुणांतून प्रकाशात आणणारा. सप्ताहातील ता. १ ते २ हे दिवस विशिष्ट सुवार्तांच्या प्लॅशन्यूज देतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना संकष्टीचा चंद्रोदय जीवनातील आशावाद वाढवेलच. संतसज्जनांचा सहवास घडवेल. मात्र सप्ताहात एकूणच आपल्या राशीने मूर्खांचा सहवास टाळावाच. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या सप्ताहात चंद्रकलांच्या समवेत शुक्रकलांचाही छान आस्वाद घेता येईल. अर्थातच संकष्टीच्या चंद्रोदयातून पती वा पतीचा उत्कर्षातून आनंद साजरा कराल, पर्यटनक्षेत्री नको. घरच्या घरी साजरा करा.
व्यावसायिक तेजी राहील
वृश्चिक : सप्ताहातील सुरुवातीचे पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपात बोलेल. स्त्रीवर्गाशी वाद वा गैरसमज टाळा. घरातील मौल्यवान वस्तू जपा. गर्दीच्या ठिकाणी विचित्र प्रसंग घडू शकतात. बाकी सप्ताहात शुभग्रहांची स्पंदने ता. १ ते ३ या दिवसांत छानच खेचून घ्याल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी आणि विवाह आदी माध्यमांतून उत्तम ट्रॅक राहील. माणसांची प्रसन्न दर्शने होतील. संकष्टीचा गुरुवार चंद्रोदयातून आध्यात्मिक अनुभूती देईल. व्यावसायिक तेजीच राहील. भावा-बहिणींची कार्ये ठरतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ प्रसन्न करतील. काहींचे मोठे आदरसत्कार होतील. मुलाबाळांचे परदेशात भाग्योदय होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी प्रवासात सांभाळावे.
खरेदी-विक्रीत काळजी घ्यावी
धनु : सप्ताहातील पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र अनपेक्षित दुर्घटनांतून सतावू शकते. काहींना वेदनायुक्त व्याधींतून त्रास होईल. वृद्धांनी सांभाळावेच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह संमिश्र स्वरूपाचाच वाटतो. एखादे संशयपिशाच ग्रासू शकते. श्रीगणेशांचे स्मरण ठेवा. ता. १ ते ३ हे दिवस साधनेचे फळ पदरात पाडतील. विशिष्ट नुकसान टळेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट व्यावसायिक लाभ संकष्टीचा चंद्रोदय साजरा करेल. सप्ताहात जुन्या गुंतवणुकी धन वर्षाव करतील. मित्र सहकार्यातून चमत्कार घडतील. सप्ताहात प्रेमिकांनी वादविवाद टाळावेत. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात खरेदी-विक्रीतील फसवणुकीचे प्रसंग टाळावेत.
एखादा गॉडफादर भेटेलच
मकर : सप्ताहातील चंद्रकलांच्या स्पंदनांतून शुभ ग्रहांची कनेक्टिव्हिटी साधून घ्याच. ता. १ ते ३ हे दिवस छान मानसिक कोषात ठेवतील. मात्र सप्ताहात पोटाचे विकार जपा. बाकी सप्ताहातील संकष्टीचा शुक्रवारचा चंद्रोदय वैवाहिक जीवनातून भावोत्कट स्वरूपातून साजरा कराल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी आणि विवाह आदी माध्यमांतून मोठे मार्ग दिसतील. मदत करणारा एखादा गॉडफादर भेटेलच. काहींना मंत्रालयातून लाभ होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती एखादा नवस फेडतील. विशिष्ट कोर्ट प्रकरणात तडजोड होईल. विशिष्ट भागीदारीचे प्रश्न निकालात निघतील. पुत्रचिंतेतून मुक्त व्हाल. बुधवारचा सूर्योदय मोठ्या सुवार्तांचा राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लॉटरी लागेल.
भागीदारीतील तणाव जातील
कुंभ : पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाचेच राहील. सतत अवधान ठेवूनच वाटचाल करा. यंत्रे, वाहने आणि विद्युत उपकरणे जपून हाताळा. बाकी सप्ताहातील पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र शुभ ग्रहांची रसद पुरवेलच. कौटुंबिक पार्श्वभूमीवर पौर्णिमा पुत्रपौत्रांचा उत्कर्षच घडवेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट नैतिक विजय मिळवून देणारीच पौर्णिमा. शततारका नक्षत्रास ता. १ ते ३ हे दिवस विशिष्ट गुप्तचिंता घालवणारेच ठरतील. काहींची व्यावसायिक वसुली होईल. तरुणांचे विवाहप्रश्न मार्गी लागतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठे परिस्थितीजन्य लाभ थक्क करतील. भागीदारीतील तणाव जातील. राजकीय शत्रुत्व शमेल.
यशाची कमान चढती राहील
मीन : सप्ताहातील पौर्णिमा अतिशय शुभलक्षणी राहील. नोकरी-व्यावसायिक शुभसंकेत मिळतीलच. काहींना छान राजकीय पाठबळ लाभेल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुकृपेतून तारणारीच पौर्णिमा. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची ता. १ ते ३ या दिवसांत यशाची चढती कमानच राहील. धन, सुत आणि दारा या त्रिघटकांतून सतत सुवार्ता कानावर येतील. ता. १ चा सूर्योदय विलक्षण आनंद साजरा करेल. तरुणांचा शैक्षणिक एक टप्पा निश्चितच गाठला जाईल. साडेसाती हा शब्द वागण्याबोलण्यातून टाळाच. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारचा संकष्टीचा दिवस पुर्वसुकृत फळाला आणणाराच. विघ्नहर्त्याची स्पंदने चंद्रोदयी जाणवतील. सहकुटुंब चंद्रोदय चातकासारखा पाहाल. व्यावसायिकांची मोठी उत्सव प्रदर्शने होतील. थोरामोठ्यांच्या गाठीभेटीतून धन्यता.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.