पदग्रहणापूर्वीच नगराध्यक्ष ॲक्शन मोडमध्ये
राजगुरुनगर, ता. २७ : राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रामुख्याने चर्चिल्या गेलेल्या पाणीप्रश्नाची दखल नवनिर्वाचित नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांनी सर्वात आधी घेतली असून त्यांनी पदग्रहण करण्यापूर्वीच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. अल्पावधीतच हे काम पूर्ण होऊन राजगुरुनगरकरांना पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.
जुन्या कडूस प्रादेशिक योजनेत सुधारणा करून १८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेली नवीन पाणीयोजना राजगुरूनगरसाठी २०१९ मध्ये केली गेली. पाणीयोजनेचे काम २०२०मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र २०२४ वर्ष उजाडले तरी काही ना काही कारणाने ती रखडत राहिली. आता ती कशीबशी पूर्ण झाली, पण योजनेतून स्वच्छ व शुद्ध पाणी येत नाही. म्हणजेच जलशुद्धीकरण यंत्रणा कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. तसेच पूर्ण क्षमतेने पाणी येत नसल्याने शहराच्या अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होतो. काही ठिकाणी दिवसाआड पाणी येते, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.
नवीन योजनेत चासकमान धरणात जॅकवेल व उपसा यंत्रणा बसवून धरणातून वेताळे गावच्या समजाई टेकडीवरील ११० दलघमी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ऊर्ध्वनलिकेद्वारे पाणी नेण्यात आले आहे. ही जलवाहिनी जुनाट झाल्याने बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम १ कोटी ६१ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाचे आहे, असे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सांगितले. याच कामाची पाहणी त्यांनी व नगराध्यक्ष गुंडाळ यांनी शुक्रवारी (ता. २६) केली. हे काम अंतिम टप्प्यात असून नवीन जलवाहिनीची चाचणी पूर्ण झाली की, चासकमान धरणातील जॅकवेलमधून दोन मोटारींद्वारे पाणी उपसा करणे शक्य होईल. त्यानंतर शहराला अधिक प्रमाणात पाणीपुरवठा करता येईल, असे गर्कळ यांनी सांगितले. नवीन नगराध्यक्षांना संपूर्ण प्रकल्पाची आणि दुरुस्तीची माहिती दिली. कडूस शिरदाळे रस्त्याचे काम सुरू असल्याने राजगुरुनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या जलवाहिन्या वारंवार फुटतात, त्यामुळेही पाणीपुरवठ्यात व्यत्यय येतो, असे गर्कळ म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

