डावपेच, चढाओढ अन् ताकदीचे प्रदर्शन
आकुर्डी, ता. २९ : आकुर्डी गावातील यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक कुस्ती स्पर्धेने यंदा कुस्तीप्रेमींना मोठी पर्वणी मिळाली. या स्पर्धेत राज्यातील नामवंत व तरुण पैलवानांनी सहभाग घेत आखाडा गाजवला. चढाओढ, डावपेच आणि ताकदीच्या प्रदर्शनामुळे संपूर्ण आखाडा उत्साहाने भारावून गेला होता.
स्पर्धेतील सर्वांत प्रतिष्ठेची पहिल्या क्रमांकाची कुस्ती महारुद्र काळे विरुद्ध सुबोध पाटील यांच्यात पार पडली. तब्बल दोन लाख रुपयांची ही कुस्ती अत्यंत चुरशीची ठरली. दोन्ही पैलवानांनी दमदार खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. अखेर आकडी डावावर महारुद्र काळे यांनी सुबोध पाटील यांच्यावर मात करत विजय मिळवला.
द्वितीय क्रमांकाची कुस्ती कालीचरण सोलंकर आणि सतपाल सोनटक्के यांच्यात झाली. एक लाख ५१ हजार रुपयांची ही लढत तांत्रिक कौशल्यासाठी लक्षवेधी ठरली. अखेर कालीचरण सोलंकर यांनी पॉइंट्सच्या आधारे विजय संपादन केला.
तृतीय क्रमांकाची कुस्ती हनुमंत पुरी विरुद्ध सागर बाबर यांच्यात झाली. एक लाख रुपयांची ही कुस्ती ताकद आणि अनुभवाचा सामना ठरली. या लढतीत हनुमंत पुरी यांनी आपला दबदबा कायम राखत विजय मिळवला.
चौथ्या क्रमांकाची कुस्ती शुभम भोसले विरुद्ध सिद्धांत डबडे यांच्यात झाली. ७५ हजार रुपयांची ही कुस्तीही प्रेक्षकांसाठी रोमहर्षक ठरली. सिद्धांत डबडे यांनी हप्त्यावर विजय मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून पैलवान रघुनाथ काळभोर, ज्ञानेश्वर कुठे, कैलास वायकर, राजू काळभोर, आकाश काळभोर, विनायक वायकर, विजय कुटे आणि किसन तात्या काळभोर यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या निष्पक्ष निर्णयांमुळे स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली.
आखाड्याचे नियोजन राष्ट्रीय खेळाडू पैलवान पप्पू काळभोर यांनी केले.
८०५०२

