कर भरतो, पण सुविधा कुठे आहेत?

कर भरतो, पण सुविधा कुठे आहेत?
Published on

रावेत, ता. २९ : पिंपरी चिंचवड शहरात रावेत आणि आकुर्डी हे वेगाने विकसित होणारे उपनगर मानले जात असले, तरी प्रत्यक्षात मूलभूत नागरी सुविधांच्या अभावामुळे येथील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. नियमितपणे मालमत्ता कर, पाणीपट्टी, घनकचरा निर्मूलन कर व विविध प्रकारचे कर भरूनही अपेक्षित सुविधा का मिळत नाहीत? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे मते मागायला येणाऱ्या सत्ताधारी आणि इच्छुकांची दमछाक होताना दिसत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रावेत, किवळे, मामुर्डी, वाल्हेकरवाडी आणि आकुर्डी हा परिसर गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तारत आहे. उंच इमारती, नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प, वाढती लोकसंख्या आणि महागड्या मालमत्ता कराच्या पावत्या यामुळे हा भाग विकसित असल्याचे चित्र रंगवले जाते. मात्र, प्रत्यक्षात मूलभूत नागरी सुविधांच्या अभावामुळे येथील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पालिकेच्या ‘सारथी’ अ‍ॅपवर तक्रारी करूनही अनेकदा केवळ ‘वर्क इन प्रोग्रेस’ असा प्रतिसाद मिळतो, प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत फारसा बदल होत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.

रस्त्यांची दुरवस्था कायम
रस्त्यांची दुरवस्था ही या भागातील सर्वांत मोठी समस्या ठरली आहे. अनेक अंतर्गत व मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात सर्वत्र धूळ असते. केबल, पाइपलाइन किंवा ड्रेनेजच्या कामानंतर रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिकांना रोज धोका पत्करावा लागत आहे. रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे.

पाणीपुरवठा अपुरा
पाणीपुरवठ्याची स्थितीही समाधानकारक नाही. आकुर्डी व रावेतमधील अनेक सोसायट्यांमध्ये अनियमित व कमी दाबाने पाणी येते. परिणामी, नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. महानगरपालिकेला पाणीपट्टी भरतो, मग टँकर का घ्यावा लागतो? असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत.

कोंडीत जीव अडकला
वाहतूक कोंडी ही रोजचीच डोकेदुखी झाली आहे. रावेत, किवळे, मामुर्डी, वाल्हेकरवाडी, आकुर्डी मुख्य रस्ते, सेवा रस्ता आणि चौकांवर सकाळ-सायंकाळ प्रचंड गर्दी असते. अपुरे सिग्नल, नियोजनशून्य रस्ते आणि वाढती वाहनसंख्या यामुळे नागरिकांचा मौल्यवान वेळ वाहतुकीत जात आहे. पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅकचा अभावही ठळकपणे जाणवतो.

कचरा संकलन व्यवस्थापन शून्य
कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर आहे. काही भागात नियमित कचरा उचल होत नाही. उघड्यावर साचलेला कचरा, दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.


धुळीमुळे हवेची गुणवत्ता खराब
रावेतमधील हवा गुणवत्ता निर्देशांक सध्या खराब ते गंभीर श्रेणीत आहे, जिथे ‘एक्यूआय’चा (हवा गुणवत्ता निर्देशांक) आकडा २०० ते ३०० पेक्षा अधिक आहे. ज्यामुळे संवेदनशील लोकांसाठी आरोग्याचा धोका आहे आणि घराबाहेर कमी वेळ घालवण्याचा सल्ला दिला जातो. रावेत, किवळे, आकुर्डीसारख्या ठिकाणी प्रदूषण जास्त असून, PM2.5 आणि कार्बन मोनोक्साइडची पातळी वाढली आहे.


महानगरपालिका कर गोळा करण्यात तत्पर आहे, पण सेवा देण्यात उदासीनता दिसते. निवडून आलेले लोकप्रतिनिधी पुन्हा तोंड दाखवत नाहीत, त्यामुळे ही समस्या आली.
- अनिल जोशी, ज्येष्ठ नागरिक, आकुर्डी

आम्ही वेळेवर सगळे टॅक्स भरतो, पण रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरावा लागतो. पाइपलाइन किंवा केबलच्या कामानंतर रस्ता तसाच सोडला जातो. काही ठिकाणी गढूळ, तर काही ठिकाणी अपुरा पाणी पुरवठा होता.
- सचिन पाटील, रहिवासी, रावेत

पाण्याचा पुरवठा अनियमित आहे. कधी पाणी कमी दाबाने येते, तर कधी पूर्णपणे बंद असते. टँकरवर अवलंबून राहावे लागते.
- संगीता देशमुख, गृहिणी, आकुर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com