(पान ४ ला सुधारीत मेन)
SKD26B04106
शिंदखेडा : सर्वसाधारण सभेत चर्चा करताना नगरअध्यक्ष कलावती माळी व नगरसेवक.
----------------
शिंदखेड्याचा आठवडे बाजार पुन्हा नदीकाठावर
नगरपंचायतीच्या सभेत ३१ विषयांना मंजुरी; ठेकेदारांवरील कारवाई व पुनर्निविदेचे दोन प्रस्ताव फेटाळले
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. १६ : शिंदखेडा नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. १६) महात्मा ज्योतिबा फुले समाज मंगल कार्यालयाच्या सभागृहात नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे शहराचा आठवडे बाजार पुन्हा नदीकाठावर भरविण्याचा निर्णय. या निर्णयासह अजेंड्यावरील ३३ पैकी ३१ विषयांना मंजुरी देण्यात आली, तर दोन विषयांना बहुमताने नामंजुरी देण्यात आली.
सभेला भाजपच्या ११ नगरसेवकांपैकी दोन सदस्य अनुपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे सर्व सहा सदस्य उपस्थित होते. भाजपचे स्वीकृत नगरसेवक अनिल वानखेडे तसेच राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक प्रा. दीपक माळी उपस्थित होते. भाजपचे नगरसेवक दीपक देसले आणि नगरसेविका संगीता सोनवणे अनुपस्थित होत्या. सभेच्या प्रारंभी मागील बैठकीचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. त्यानंतर विविध विकासकामांवरील विषयांवर सविस्तर चर्चा झाली. भाजपच्या बहुमतामुळे नगरपंचायतीच्या बोधचिन्हास मान्यता देण्यासह प्रभाग क्रमांक २, ३, ५, ६, ७, ८, १०, ११, १२, १३, १५, १६ आणि १७ मधील विविध विकासकामांना हिरवा कंदील मिळाला.
याशिवाय शहरातील आवश्यक ठिकाणी गतिरोधक उभारणे, आठवडे बाजार नदीकाठावर स्थलांतरित करणे, भगवा चौक ते नवीन पूल हा रस्ता नगरपंचायतीकडे हस्तांतरित करणे, पाणीपुरवठा योजनेतील नळजोडण्यांची समितीसमोर चाचणी घेणे, नगरपंचायत हद्दीतील मालमत्तेचे सर्वेक्षण करणे, तसेच दिव्यांग, महिला आणि बालकल्याणासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवणे या महत्त्वाच्या विषयांनाही मंजुरी देण्यात आली. सभेला नगराध्यक्षा कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, अभियंता विपुल साळुंखे यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
दोन प्रस्तावांना बहुमताने नकार
मुदत संपूनही विकासकामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविणे तसेच मुदत उलटूनही सुरू न झालेल्या विकासकामांसाठी पुनर्निविदा प्रक्रिया राबविणे या दोन विषयांना सभेत बहुमत असलेल्या भाजप नगरसेवकांनी नामंजुरी दिली.
आठवडे बाजारातील उलाढाल वाढणार
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी शिंदखेडा शहराचा आठवडे बाजार नदीकाठावर भरत होता. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने येथे खरेदीसाठी येत असत. कालांतराने बाजाराचे स्थलांतर करण्यात आले होते. आता नगरपंचायतीच्या नव्या निर्णयानुसार आठवडे बाजार पुन्हा नदीकाठावर भरविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सर्व विक्रेते एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार असून, बाजाराचे नियोजन आणि व्यवस्थापन अधिक सुलभ होईल. ग्राहकांना भाजीपाला, फळे आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करता येणार असल्याने वेळेची बचत होईल. तसेच शहरातील आठवडे बाजाराला नवसंजीवनी मिळून व्यापारी उलाढालीतही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.