SMD26B01047
पिंपळनेर : बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करताना नगराध्यक्षा डॉ. योगिता चौरे, बांधकाम सभापती राजेंद्र शिरसाठ आणि डॉ. जितेश चौरे.
-------
पिंपळनेर बसस्थानक परिसरात वृक्षारोपण
‘हरित पिंपळनेर’ संकल्पनेला एसटी प्रशासनाचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सामोडे, ता. १६ : पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्यासाठी पिंपळनेर नगर परिषदेच्या पुढाकारातून बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. नगराध्यक्षा डॉ. योगिता चौरे, बांधकाम सभापती राजेंद्र शिरसाठ आणि डॉ. जितेश चौरे यांच्या हस्ते विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या वृक्षारोपण मोहिमेत रामफळ, सीताफळ, चिंच, लिंबू, लिंब, जांभूळ, निलगिरी यांसह अनेक उपयुक्त आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. भविष्यात ही झाडे प्रवाशांना सावली, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून देणार असल्याने या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले. या वेळी वाहतूक अधीक्षक राकेश आर. वाघ, साक्रीचे वाहतूक निरीक्षक प्रफुल पाटील, साक्री- पिंपळनेरचे वाहतूक नियंत्रक इम्रान सय्यद, वाहक एस. पी. साळुंखे, सचिन गाडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.