

शिरूर, ता. २५ : शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत गेल्या दहा वर्षांपासून भ्रष्ट कारभार चालू आहे. त्याची चौकशी करावी व गैरव्यवहारप्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी याच पतसंस्थेचे माजी सभापती नंदकिशोर पडवळ यांनी केली आहे. संचालक मंडळाचा भ्रष्ट कारभार थांबविण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पडवळ यांनी याबाबतचे निवेदन सहाय्यक निबंधक अरूण साकोरे यांना दिले असून, पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरूद्ध अनेक गंभीर आरोप केले आहेत. या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘संस्थेत अनधिकृत सभासद करून त्यांना नियमबाह्यपणे ३५ लाख रुपयांपर्यंत कर्ज वाटप केले, प्रतिबंध असतानाही त्याच सभासदास पुन्हा कर्ज दिले. सभासदांना खोट्या एनओसी दिल्या. संस्थेतील कामासाठी मागविलेल्या निविदा खोट्या असून, निविदांवर फोन नंबर, पूर्ण पत्ता नाही. निविदेवरील दुकान अस्तित्वात नाही. निविदा फोडण्याआधीच संबंधित काम चालू केले. विरोध केल्यास दबाव आणला जातो.’’
शिरूर तालुक्यात सेवा केलेले शिक्षक बदली झाल्याने इतर तालुक्यात गेले असून, त्यांना कर्ज वाटप सुरू करावे, अशी प्रमुख मागणी असल्याचे पडवळ यांनी सांगितले. ते म्हणाले, अनधिकृत कर्ज वाटपाबाबतच्या तक्रारीनंतर ते ३५ लाखांचे कर्ज संचालक मंडळाने भरावे, असा आदेश सहायक निबंधकांनी दिला असताना भ्रष्ट संचालक मंडळाने तालुकास्तरावरील निकालाविरोधात जिल्हास्तरावर अपील केले. तेथेही निकाल विरोधात गेल्यावर राज्यस्तरावर अपील केले. यासाठी पतसंस्थेतील पैशांची उधळपट्टी केली गेली.
संचालकांना दंड झाला असताना त्यासाठी न्यायालयीन लढा लढण्यासाठी पतसंस्थेतून म्हणजेच सभासदांच्या पैशांचा वापर केला या खर्चाला जबाबदार कोण, हे पैसे संचालक मंडळाच्या खिशातील आहेत का, १०१ पूर्व नोटीस देऊनही त्याच सभासदास पुन्हा कर्ज दिले जाते यापेक्षा मोठा गुन्हा असू शकतो का, असे सवालही पडवळ यांनी केले आहेत. पतसंस्थेच्या ऑडीटरसाठी चार लाख रुपयांचे कोटेशन आले असताना दहा लाख रुपयांचे कोटेशन स्वीकारून ऑडिट केले गेल्याचा आरोप त्यांनी केला. कर्जरोखे न घेता कर्जवाटप करणे म्हणजे कुठेतरी अफरातफर होते हे निश्चीत असून, एकूणच पतसंस्थेत गेले दोन टर्म गलथान कारभार चालू असल्याची टीका त्यांनी केली.
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था ही एक विश्वासार्ह संस्था असून, संस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावणारा आहे. काही बाबी न्यायप्रविष्ट असून, त्याचा योग्य वेळी खुलासा होईल. संस्थेचे कर्जवाटप व इतर कामे नियमानुसार असून, संस्थेवरील भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आहेत. कर्ज थकबाकी, मिटींगांना गैरहजर राहात असल्याच्या कारणावरून अपात्र ठरलेल्या व त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या व्यक्तीला हाताशी धरून संस्थेला बदनाम करण्याचा व चांगल्या चाललेल्या संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा हा विरोधकांचा कावा आहे.
- शर्मिला निचित, सभापती,
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.