
बेलभंडारा उधळून झाला नरवीरांच्या शौर्याचा जागर
खडकवासला, ता. १५ : सिंहगडाच्या श्री अमृतेश्वर मेटावर माघ वद्य अष्टमीच्या रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रमात बेलभंडारा उधळून, ‘हर हर महादेव’च्या गजर करीत नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचा जागर मंगळवारी करण्यात आला.
माघ वद्य नवमी या मालुसरे यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षे अष्टमीच्या रात्री खंडोजी सरनाईक यांचे वंशज जोरकर जागरण गोंधळाचे आयोजन करतात. दरम्यान, मालुसरे त्या रात्री सिंहगडावर आले. तोच मध्यरात्रीच्या अंधारातील थरार मावळ्यांनी मंगळवारी रात्री अनुभवला.
यंदाच्या गोंधळाला इतिहास अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते, अशोक सरपाटील, शस्त्र अभ्यासक राकेश धावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. दुर्गसंवर्धन संस्था, शिवभूमी भ्रमंती संस्था, सिंहगड पावित्र्य मोहीम, सिंहगड परिवाराचे पदाधिकारी, ॲड. प्रकाश केदारी, विजय कोल्हे, आशा केदारी, गणेश जाधव, हनुमंत जांभुळकर, नितीन चव्हाण आदी उपस्थित होते. जोरकर कुटुंबातील तरुण महिला व दुर्ग दऱ्यातील पंचमुखी मारुती मित्रमंडळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये खामकर, सांबरे, पढेर, लांघी, वारुंडे कुटुंबातील नागरिकांचा सहभाग होता.
श्री अमृतेश्वर मेटावरील मंदिरासमोर माघ वद्य अष्टमीच्या रात्री जागरण गोंधळ केला जातो. गोंधळाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांनी ३५० वर्षांपूर्वी त्यावेळचे मेटाचे सरनाईक खंडोजी नाईक कोळी यांच्याकडून गडावरील माहिती घेत गडावर आक्रमण केले. गड स्वराज्यात आणून त्यांनी छत्रपती शिवरायांचे स्वप्न पूर्ण केले, अशी आठवण नाईक यांचे वंशज अभिमानाने सांगतात.
-डॉ. नंदकिशोर मते, सिंहगडाच्या इतिहासाचे अभ्यासक
समाधी स्मारक सजविले फुलांनी
मालुसरे यांचे समाधी स्मारक, अर्धपुतळा, मेघडंबरी, स्वराजनिष्ठा शिल्प परिसराची फुलांनी आकर्षक सजावट केली होती. ही सजावट कोंढवे धावडे येथील माजी उपसरपंच सनीत लिंबोरे, प्रवीण पोकळे, जाकीर सय्यद, विलास मोरे, चैतन्य बोडके यांनी केली होती.