कँटोन्मेंट, ता. २८ ः ‘अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून टप्प्या-टप्प्याने आंदोलन करून यश संपादित केले आहे. मुलींच्या पहिल्या शाळेच्या स्मारकाचा मार्ग ज्या पद्धतीने मोकळा झाला, त्याच पद्धतीने महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग आनंदाने मोकळा व्हावा. फुले स्मारकासाठी आगामी काळात निधी उपलब्ध न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही,’ असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी मंगळवारी येथे दिला.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांचा स्मृतीदिन आणि समता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी आमदार रवींद्र धंगेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी महापौर वैशाली बनकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्रीतेश गवळी, प्रदेश महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, पुणे महानगर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, शब्बीर अन्सारी, माजी सनदी अधिकारी महेश झगडे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी महात्मा फुले समता पुरस्कार भुजबळ यांच्या हस्ते ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांना प्रदान करण्यात आला. नागेश गवळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गौतम बेंगाळे यांनी मानपत्राचे वाचन केले.
------------------------
हक्कासाठी लढण्याचा प्रत्येक समाजाचा अधिकार
राज्यात अलीकडे नवीनच वर्णव्यवस्था अस्तित्वात येऊ पाहत आहे. मी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. हक्कासाठी लढण्याचा प्रत्येक समाजाचा अधिकार आहे, परंतु गावबंदीसारखे मार्ग अवलंबून कोणी हक्कांवर गदा आणू पाहत असेल, तर त्याविरोधात आम्ही आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला कोणाशीही भांडायचे नाही, पण आमच्या हक्कांवर कोणी गदा आणि गंडांतर आणणार असेल, तर आम्ही शांत बसणार नाही, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.