स्वतःला नेते म्हणविणाऱ्यांची पोरकट भाषा

स्वतःला नेते म्हणविणाऱ्यांची पोरकट भाषा

मांजरी, ता. ११ : ‘‘ही लढाई कौटुंबिक नसून देशाच्या विकासाची आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक झालात, अशी पोरकट भाषा कशी करता?, तुम्ही देशाचे, राज्याचे नेते होऊ इच्छिता, मग देशाबाबत बोला ना. मैत्रिणींशी गप्पा मारत बसल्यासारखे कशाला वागता?, घरातली उणीदुणी काढून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार आहेत का?’’, असा प्रश्न उपस्थित करत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला.
शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सांगता
मांजरी बुद्रुक येथील सभेने झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार महादेव बाबर, प्रशांत जगताप, प्रवीण तुपे, दिलीप तुपे, नीलेश मगर, राहुल घुले, विक्रम शेवाळे, शिवाजी आदमाने, बाळासाहेब विभूते, सागर बत्ताले, बालाजी अंकुशराव, स्वप्नील वसवे, धनराज घुले आदी उपस्थित होते.
घरातील विषय माईकवर बोलण्यासारखे नाहीत. मी नाही ते बोलत. मी लोकप्रतिनिधी म्हणून भाषण करते. आगामी पाच वर्षांत काय करणार, हे सांगते. काही लोक माईकवर सर्व खरे-खोटे बोलतात. अरेला कारे म्हणायला ताकद लागते आणि अरे म्हटल्यानंतर सहन करून गप्प राहण्याला जास्त ताकद लागते. ती आमच्याकडे आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महिलांची सुरक्षितता हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यावर बोलले पाहिजे. पुण्यात मी लहानाची मोठी झाले; परंतु कधी फिरताना भीती वाटली नाही. आता सध्याच्या सरकारच्या काळात तशी परिस्थिती राहिली नाही. आर. आर. पाटील, अनिल देशमुख गृहमंत्री असताना कधी कोयता गॅंग नव्हती. हे नवीन सरकार आल्यापासून नको त्या गोष्टी घडत आहेत. ड्रग्जच्या नशेने मुलांना वेढले असल्याचे सुळे यांनी सांगितले.

अदृश्य शक्तीने पक्ष, चिन्ह काढून घेतले
बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदा १४३ लोकांना पैसे वाटताना व घेताना पकडले आहे. रात्रीची बँक उघडी ठेवली म्हणून तेथील व्यवस्थापकाला जबाबदार धरून अटक केली आहे. त्या बिचाऱ्याचा काय दोष, त्याला मी सोडवून आणेन. मात्र त्याला बँक उघडी ठेवण्याचा आदेश देणाऱ्यांना अटक करा. दिल्लीच्या अदृश्य शक्तीने पक्ष आणि चिन्ह काढून घेतले; मात्र विचार जाग्यावर राहिले. अनेक प्रलोभने दाखवूनही डॉ. अमोल कोल्हे मात्र त्या विचारांबरोबर राहिले. त्यांच्यासारख्या चांगल्या माणसाला पुन्हा संसदेत पाठविण्याची जबाबदारी आपली आहे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com